महाड (रायगड) : श्रीकृष्ण बाळ
रायगडच्या पायथ्याशी, रस्त्याविना आणि सुविधांविना असलेल्या सांदोशीसारख्या दुर्गम गावात जर २० महिला एकत्र येऊन शेवग्याच्या शेतीतून स्वतःच्या भवितव्याची पेरणी करू शकतात, तर ग्रामीण महिला सक्षमीकरणाची खरी सुरुवात इथूनच होत नाही का?
महाड तालुक्यातील रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या अत्यंत दुर्गम अशा सांदोशी गावात २८ डिसेंबर रोजी एक शांत पण अर्थपूर्ण बदल घडून आला. विश्वरूप प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील वीस महिलांनी एकत्र येत शेवग्याच्या रोपांचे वाण स्वीकारले आणि सामूहिक शेतीचा निर्धार केला. महाडहून स्कुटीने दीड तासांचा खडकाळ प्रवास, पाचाडनंतर अर्धा तासाचा अवघड रस्ता, वाड्यांवर मोजकी घरे आणि मूलभूत सुविधांचा अभाव या सगळ्या अडचणी असूनही या महिलांचा आत्मविश्वास आणि तयारी पाहून उपस्थितांना समाधान वाटले.
या उपक्रमासाठी कृष्णा सरकले यांनी पुढाकार घेऊन महिलांना एकत्र आणले. शेवग्याची लागवड कशी करावी याबाबत कृष्णा सोनावले यांनी महिलांना आधीच मार्गदर्शन केले होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे महिलांनी स्वतःच्या मेहनतीने लागवडीसाठी खड्डे खणून तयार ठेवले होते. शंभर टक्के रोपे जगवण्याचे आश्वासन देणाऱ्या मेहनती आणि जिद्दी महिलांची निवड केल्याबद्दल कृष्णा सोनावले यांचे विशेष आभार मानण्यात आले.
विश्वरूप प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाड तालुक्यातील सांदोशी गावात पहिल्यांदाच शेवग्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती स्तरावर या गावाबद्दल माहिती घेतली असता, तेथे कोणताही बचत गट नसल्याची नोंद आढळली. गावाचे सरपंच आदिवासी असूनही, रस्त्यांचा अभाव असलेले हे गाव पर्यावरणदृष्ट्या समृद्ध आहे. अशा परिस्थितीत वीस महिलांनी एकत्र येऊन शेवग्याची ग्रुप शेती करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच प्रेरणादायी आहे.
या वेळी मीनल बुटाला यांनी महिलांना शेतीविषयक प्राथमिक माहिती देत शेवग्याची रोपे वाटप केली. याच भेटीदरम्यान महिलांनी पपई शेतीबाबतही उत्सुकतेने माहिती विचारली. शिकण्याची तयारी, पुढे जाण्याची इच्छा आणि एकत्र काम करण्याची जिद्द पाहून समाधान व्यक्त करण्यात आले.
ग्रामीण विकासाला दिशा
विश्वरूप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रोहिणी सतीश धारप यांनी दूरध्वनीवरून या महिलांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. विश्वरूप प्रतिष्ठानने केलेली ही सुरुवात येत्या नव्या वर्षात शेतकरी उत्सुक महिलांसाठी एक नवा टर्निंग पॉईंट ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सांदोशीतील महिलांनी दाखवलेली ही हिंमत आणि आत्मनिर्भरतेकडे टाकलेले पाऊल ग्रामीण विकासाची खरी दिशा दाखवणारे आहे.