China Fire Crackers Ban News
उरण : दिवाळीच्या धामधुमीपूर्वी महसूल गुप्तचर संचालनालयाने मुंबईत एक मोठा बॉम्ब फोडला आहे. सणासुदीच्या काळात देशाच्या सुरक्षेशी खेळ करणार्या तस्करांवर डीआरआय ने जोरदार प्रहार केला आहे. अत्यंत धूर्तपणे ‘मिनी डेकोरेटिव्ह प्लांट्स’ (लहान शोभेची रोपे) च्या नावाखाली तब्बल 2.4 कोटी रुपये किमतीचे प्रतिबंधित चिनी फटाके आयात करणार्या एका व्यापार्याला डीआरआय च्या पथकाने न्हावा शेवा बंदरातून अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जयसिंग शेळके (वय 36, रा. घाटकोपर ) असून, तो मेसर्स जय ओव्हरसीज या कंपनीचा मालक आहे. आपल्या कंपनीचा आयात-निर्यात कोड वापरून शेळकेने हा धोकादायक माल चीनमधून मागवला होता. हे चिनी फटाके भारतीय कायद्यानुसार प्रतिबंधित आहेत आणि ते ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सच्या सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. यामुळे केवळ प्रदूषण नाही, तर सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो. हे एक मोठे रॅकेट आहे, असे एका अधिकार्याने सांगितले.
डीआरआय सूत्रांनुसार, शेळके डिसेंबर 2023 पासून नियमितपणे याच क्युआर कोडचा वापर करून आयात करत होता. त्याने अनेक स्थानिक वितरकांची मागणी एकत्र करून चीनमधील एका पुरवठादाराला ऑर्डर दिली होती. अधिकार्यांचा संशय आहे की, ही त्याची पहिली यशस्वी तस्करी नसावी. डीआरआय ने शेळकेला ताब्यात घेतले असून, आता त्याचे आर्थिक व्यवहार, मागील आयातीचे रेकॉर्ड आणि या रॅकेटमधील कथित साथीदार यांचा कसून तपास सुरू आहे.
सीमकार्ड केले नष्ट
माल पकडल्यानंतर शेळकेने आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवण्याचा प्रयत्न केला. त्याने तातडीने आपला सीमकार्ड नष्ट केले आणि जीएसटी नोंदणीशी जोडलेले आपले कार्यालय देखील बंद केले. मात्र, डीआरआय त्याच्या एक पाऊल पुढे होती. त्यांनी तातडीने कारवाई करत हे चिनी बनावटीचे फटाके जप्त केले.