मुंबई : भुयारी मेट्रोच्या वरळी ते कफ परेड या अखेरच्या टप्प्याचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले आणि गुरुवारी आरे जेव्हीएलआर स्टेशनवरून कफ परेडसाठी पहाटे 5:55 ची पहिली मेट्रो धावली. या मेट्रो सेवेला मुंबईकरांनी पहिल्याच दिवशी मोठी पसंती दिली. रात्री 10:30 पर्यंत 1 लाख 56 हजार 456 प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला.
लोकलच्या गर्दीतून थेट आरामदायी, गारेगार व वेळ वाचवणारा प्रवास करता आल्याने प्रवाशांनी या सेवेचे स्वागत केले आहे. तिकिटाचा खर्च थोडा जास्त आहे, पण मुंबईच्या गर्दीतून सुटका झाल्याची भावना काही प्रवाशांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केली. विशेष म्हणजे सीएसएमटी, चर्चगेट रेल्वे स्थानकांना ही सेवा जोडल्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळणार आहे.
बुधवारपर्यंत आरे ते आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंत या भुयारी मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या 70 ते 80 हजारांदरम्यान होती. गुरुवारपासून हा संपूर्ण 33 किमीच्या मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री10:30 वाजेपर्यंत आरे ते कफ परेड या 33 किलोमीटरच्या मार्गिकेवर 1 लाख 56 हजार 456 प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी या सेवेला चांगलीच पसंती दिली आहे.
तेवढ्याच पैशांत आरामदायी प्रवास
काळबादेवी ते कफ परेड या मार्गावर बेस्टच्या गर्दीतून प्रवास करावा लागत होता. यासाठी येता-जाता 40 रुपये खर्च होत होता. आता तेवढ्याच पैशांत आरामदायी प्रवास करता येत असल्याचे एका प्रवाशाने सांगितले.
वरळीपर्यंतच नेटवर्क पकडतेय
आरे ते आचार्य अत्रे चौक या टप्प्यात वोडाफोनचे नेटवर्क उपलब्ध आहे. पुढील टप्प्यातही नेटवर्क कार्यान्वित करण्यासाठी एमएमआरसीएलने प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळेे नेटवर्क उपलब्ध झालेले नाही. परिणामी, वरळीनंतर नेटवर्क जात आहे व इंटरनेटवर आधारित तिकीट सेवेत अडचण येत आहे.
दक्षिण मुंबईत कामानिमित्त ये-जा करणार्या प्रवाशांचा मेट्रो प्रवास दादरपर्यंतच संपत होता. तेथून चर्चगेट, सीएसएमटीला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करावा लागत होता. आता उपनगरातून निघालेल्या प्रवाशांना मेट्रोने थेट चर्चगेट, सीएसएमटीपर्यंत प्रवास करता येत आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी कफ परेडच्या दिशेला येण्यासाठी प्रवाशांनी तिकीट खिडक्यांवर गर्दी केली होती. याउलट संध्याकाळी परतीच्या प्रवासासाठी दक्षिण मुंबईतील मेट्रो स्थानकांवर गर्दी दिसून आली. संध्याकाळी साधारण सात वाजण्याच्या सुमारास विधान भवन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी दुहेरी रांग लागली होती. तेवढीच रांग तिकीट खिडकीवरही होती.
दादर ते चर्चगेट रेल्वेमार्गे जाऊन मग कफ परेडपर्यंत टॅक्सी किंवा बसने प्रवास करावा लागत होता. पण आता दादरवरून थेट कफ परेडपर्यंत प्रवास करता येत असल्यामुळे वेळ वाचत आहे. तिकिटाचा खर्च थोडा जास्त असला तरी ट्रेनच्या गर्दीतून सुटका झाली आहे.
शुभिका, प्रवाशी