District Hospital Building Pudhari
रायगड

District Hospital Building: जिल्हा रुग्णालयाची इमारत सलाईनवर; कर्मचाऱ्यांवर जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ

आंतररुग्ण विभागाची दुरवस्था

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: मुसळधार पडलेल्या पावसाचा फटका रुग्णालय इमारतीवर झाला आहे गेल्या आठवड्यात लहान बालकांच्या वॉर्ड मधील प्रकाराने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण विभागाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य छतांना गळती लागली आहे.

छताचे तुकडे पडण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. भिंतींना शेवाळ पकडली आहे. मागील १३ वर्षात या इमारतीच्या सुमारे १५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. असे असूनही रुग्ण तसेच कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आंतररुग्ण विभागाची इमारत १९८०-८१ साली बांधण्यात आली. त्यावेळी दोन मजली इमारतीच्या बांधकामासाठी ३४ लाख रुपये खर्च आला होता. सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. मागील १५ दिवसात पीओपीचे तुकडे पडण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. सुदैवान यामध्ये कुणीही जखमी झाले नाही.

जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य छतांना गळती लागली आहे. भिंतीना शेवाळ पकडली आहे. रुग्णालयात स्वच्छता दिसून येत आहे. कोंदट वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक तसेच कर्मचाऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

दुरुस्तीवर १५ कोटी खर्च

जिल्हा रुग्णालय इमारतीच्या दुरुस्तीवर १३ वर्षात सुमारे १५ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करून ४५ वर्ष पूर्ण झाली आहेत. इमारतीचे बांधकाम जीर्ण झाले असून इमारत धोकादायक बनत चालली आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीचा खर्चही वाढला आहे. १३ वर्षांत इमारतीच्या देखभाल दुरुस्ती आणि सुशोभीकरणावर सुमारे १५ कोटी निधी खर्च करण्यात आला आहे.

नवीन इमारतीची प्रतीक्षा

जिल्हा रुग्णालयाच्या अद्ययावत नवीन इमारत उभारली जात आहे. या इमारतीचे भूमिपूजन ५ मार्च २०२५ रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पार पडले. मात्र यानंतर सीआरझेड परवानगी, रक्त पेढी इमारतीचे स्थलांतर यामुळे नवीन इमारतीचे काम रखडले. सद्यस्थितीत इमारतीचे संथ गतीने काम सुरू असून, केवळ फुटिंगचे काम.पूर्ण झाल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT