माणगाव: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भिरा येथील प्रसिद्ध परंतू अतिशय धोकादायक मानल्या जाणाऱ्या देवकुंड धबधब्यावर आज एक मोठी दुर्घटना घडली. प्रशासनाने घातलेला कडक बंदी आदेश धुडकावून पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या पुण्याच्या २० पर्यटकांच्या गटातील गोपाळ रामलाल राठोड (वय-२२,रा. दामला तांडा ता. मुखेड जिल्हा नांदेड ) आणि विष्णू विलास ढोख (वय-२३,रा.रा. जयपूर ता शेणगाव , हिंगोली )हे दोन तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्याने वाहून गेले आहेत.
स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली मात्र संध्याकाळी अंधार झाल्याने ती थांबविण्यात आली आहे. सकाळी शोध मोहिम पून्हा सूरु करण्यात येईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे.
चाकण एमआयडीसी पुणे येथे वेगवगळ्या कंपनीत काम करणाऱ्या २० तरुणांचा गृप एका मिनीबसमधून येथे आला होता. त्यामध्ये ६ मुलींचाही समावेश आहे. या ठिकाणी बंदोबस्त करता असलेल्या पोलिसांनी त्यांना परत पाठवलेले होते.