महाड ः महाड पोलादपूर तालुक्यात मागील तीन आठवड्यापासून सावित्री गांधारी काळ यांसह अंतर्गत भागातील छोट्या ओढे व नाल्यांमध्ये गाळ घालण्याची प्रक्रिया मोठ्या वेगात सुरू असून महाड नगर परिषदेला पाणीपुरवठा होणाऱ्या कुर्ला धरणातून सावित्री नदीपात्रातून महाड शहरात येणाऱ्या जलवाहिनीच्या मार्गावर सध्या सुरू असलेले येथील कामाने जलवाहिनी बाधित होऊ नये या उद्देशाने नगरपरिषदेने या ठिकाणी झेंडे लावले असून त्या परिसरात गाळ काढण्याचे उत्खनन करू नये असे संबंधितांना सुचित केले आहे.
यासंदर्भात दोन दिवसापूर्वीच मंत्री भरतशेठ गोगावले यांनी या परिसराची आपल्या सहकार्य व शासकीय अधिकाऱ्यांमार्फत पाहणी करून जलवाहिनीला कोणत्याही परिस्थितीत धोका पोहोचू नये या उद्देशाने पालिका प्रशासनाने तातडीने त्या मार्गावरती शेंडे निशाणी लावावेत असे निर्देश दिले होते. जेणेकरून या ठिकाणी सुरू असलेल्या गाळ उत्खनन कामामुळे या जलवाहिनी बाधित होणार नाही याकडे त्यांनी शासकीय यंत्रणा व पालिकेच्या यंत्रणेचे लक्ष वेधले होते.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत संबंधित नदीपात्रातील जलवाहिनीच्या मार्गावर अशा पद्धतीचे झेंडे व निशाणी लावण्यात आल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या संबंधित यंत्रणांकडून समाधान व्यक्त होत आहे.
जलवाहिनीच्या सुरक्षेची दक्षता
मागील तीन वर्षात भीषण पाणीटंचाईला महाड शहरवासीयांना सामोरे जावे लागत असतानाच नदीपात्रातील या कामामुळे कुर्ला धरणातून येणारी ही जलवाहिनी बाधित होऊ नये याकरिता मंत्री गोगावले यांनी तातडीने दिलेल्या निर्देशाचे व नगरपरिषद प्रशासनामार्फत केलेल्या कार्यपूर्तीचे महाडकर नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.