Sensitive Locations in Raigad
अलिबाग : दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवली आहे. जिल्हाभरात २७ संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सागरी आणि स्थल सुरक्षा दोन्ही पातळ्यांवर दक्षता वाढविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अचल दलाल यांनी दिली.
जिल्ह्याच्या विस्तृत सागरी पट्ट्यातील साळाव, मांदाड, पेझारी, म्हसळा आणि शिघ्रे– धरमतर या महत्त्वाच्या किनारपट्टी भागांमध्ये विशेष लक्ष ठेवले जात आहे. सागरी सुरक्षा दलाचे तब्बल १२९० कर्मचारी तैनात करण्यात आले असून, दोन गस्त बोटींच्या माध्यमातून सागरी हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे.
सागरी सुरक्षेबरोबरच स्थल मार्गावरही खबरदारीचा उपाय म्हणून १२ ठिकाणी वाहतूक नाकाबंदी (नाका तपासणी) सुरू करण्यात आली आहे. संशयास्पद वाहनांची तपासणी, प्रवाशांची चौकशी आणि संवेदनशील ठिकाणी पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी स्थानिक संरक्षक दलाची मदत घेण्यात येत असून ग्रामसुरक्षा दल, कोस्टल पोलिस, स्थानिक पोलीस आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून गस्त व तपासणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता, कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा वस्तू आढळल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. रायगड जिल्हा हा सागरी आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचा असल्याने, सुरक्षा यंत्रणा सतत सक्रिय राहून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.