दापोली : प्रवीण शिंदे
कोकणातील पारंपरिक संस्कृतीचा वारसा आजची तरुण पिढी जुन्याजाणत्या माडळींच्या मार्गदर्शनाखाली उत्साहाने जोपासताना दिसत आहे. याचे बोलके उदाहरण म्हणजे यंदा दापोली तालुक्यातील अनेक गावांत साजरी झालेली ‘वाघ बारस’ परंपरा.
गाई गुरांच्या रक्षणासाठी ग्रामदेवतेला नैवेद्य दाखवून प्रसन्न करण्याची ही जुनी प्रथा आजही श्रद्धेने पाळली जाते. तुळशी विवाहानंतरच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा हा उत्सव श्रद्धा, शेती आणि लोकपरंपरेचा सुंदर संगम घडवतो.
या परंपरेतील सर्वांत वेगळा भाग म्हणजे लहान मुलांना ‘वाघ’ बनवून त्यांना प्रतीकात्मकरीत्या रानात पिटाळून लावणे. या कृतीमागे अर्थ असा की गावातील गाई गुरांवर वाघासारख्या संकटांचा अघात होऊ नये. मुलांना वाघाचे रूप देऊन ग्रामदेवतेला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि तिच्या कृपेची याचना केली जाते.
गावोगावी हा विधी गोठणात किंवा माळरानावर पार पडतो. ज्येष्ठ मंडळी परंपरेचे नेतृत्व करतात, तर तरुणाई उत्साहाने सहभागी होते. लहानांपासून थोरांपर्यंत सगळे मिळून परंपरेची ही साखळी जिवंत ठेवतात. या कार्यक्रमात ज्येष्ठ मंडळी या बच्चे कंपनील मदत करत असतात.
काळाच्या ओघात कोकणातील अनेक रूढी हरवत चालल्या असल्या, तरी ‘वाघ बारस’ ही परंपरा मात्र तरुणाईच्या सहभागामुळे आजही तितक्याच श्रद्धेने आणि आनंदात साजरी होत आहे.