Raigad BAMS vs MBBS appointment issue
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या बीएएमएस पात्रता धारण करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कंत्राटाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुनर्नियुक्ती न देता थेट कार्यमुक्त केले जात असून, त्यांच्या जागी एमबीबीएस उमेदवारांची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे अन्याय झाल्याची भावना निर्माण झालेल्या या डॉक्टरांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन देत पुन्हा सेवेत सामावून घेण्याची मागणी केली आहे.
ग्रामीण भागात डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे 2019 साली तत्कालीन राज्य सरकारने एमबीबीएस ऐवजी बीएएमएस उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर बीएएमएस डॉक्टरांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. वर्षानुवर्षे नूतनीकरण होत असताना, यंदा मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या पुनर्नियुक्तीला नकार दिला. ज्या डॉक्टरांचा कालावधी संपतो आहे, तिथे नव्याने एमबीबीएस उमेदवारांना कंत्राटी पदे दिली जात असल्याने बीएएमएस डॉक्टर आक्षेपार्ह आणि अन्यायकारक निर्णय झाल्याचे सांगत आहेत.
कंत्राटी डॉक्टरांनी 2019 पासून सातत्याने सेवा दिली असून, कोविड काळातही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. ‘सशक्त नारी, सशक्त परिवार’ अभियानातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना रात्री-अपरात्री आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कोणत्याही प्रकारच्या तक्रारी नसताना पुनर्नियुक्ती न मिळणे म्हणजे सरळ अन्याय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर कंत्राटी डॉक्टरांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. मंत्र्यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्याशी चर्चा करून योग्य तो विचार करण्याच्या सूचना दिल्या. खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र दळवी यांनी देखील डॉक्टरांच्या समर्थनार्थ सकारात्मक भूमिका घेतल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तरीदेखील जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.
अचानक पुनर्नियुक्ती नाकारल्याने कंत्राटी डॉक्टरांपुढे रोजगाराचा पेच निर्माण झाला आहे. ते सर्वजण रायगड जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी आहेत. कायमस्वरूपी एमबीबीएस अधिकारी उपलब्ध असल्यास हरकत नसल्याचे ते सांगतात; मात्र कंत्राटी नियुक्त्यांमध्ये स्थानिक आणि अनुभवी बीएएमएस डॉक्टरांना प्राधान्य द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. परंतु एमबीबीएस उमेदवार उपलब्ध असल्यामुळे बीएएमएस डॉक्टरांना पुनर्नियुक्ती देता येणार नसल्याचे जिल्हा परिषदेचे म्हणणे आहे.
कुठलाही अन्याय केला जात नाही. या उमेदवारांना कंत्राटी नियुक्ती देण्यात आली आहे. नियमित किंवा कंत्राटी स्वरूपात एमबीबीएस उमेदवार मिळेपर्यंत बीएएमएस उमेदवारांना नियुक्ती द्यावी, असे शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.- नेहा भोसले, सीईओ, रायगड जिल्हा परिषद