अलिबाग ः अलिबाग तालुक्यातील मौजे मुशेत येथे सुरू असलेल्या एका मोठ्या प्रकल्पामुळे आरसीएफ थळ रेल्वे मार्गिकेची सुरक्षा धोक्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत यांनी यासंदर्भात आरसीएफचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
संजय सावंत यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, आरसीएफ आणि जिल्हाधिकारी रायगड यांच्या अटींनुसार रेल्वे मार्गिकेपासून कोणत्याही प्रकारचे बांधकाम किमान 30 मीटर अंतरावर असणे बंधनकारक आहे. मात्र, मुशेत येथे क्षितीज बिल्डकॉन कंपनीने एम.आर. कंपनीसाठी थेट रेल्वे मार्गिकेपासून अवघ्या 5 ते 10 मीटर अंतरावर आरएमसी प्लांट आणि इतर मोठी बांधकामे सुरू केली आहेत. हे स्पष्टपणे सुरक्षा नियमांचे उल्लंघन असून यामुळे रेल्वे मार्गिकेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणात स्थानिक प्रशासनही आक्रमक झाले आहे. ग्रुप ग्रामपंचायत मापगांवच्या प्रशासकाने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार: मुशेत येथील गट क्र. 111/अ/1/9 मध्ये हे बांधकाम सुरू आहे. कामासाठी येणाऱ्या अवजड वाहनांमुळे सार्वजनिक रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली असून साईडपट्ट्या खचल्या आहेत. ग्रामपंचायतीने 17 ऑक्टोबर 2025 आणि 15 डिसेंबर 2025 रोजी दोनदा नोटीस देऊनही संबंधित कंपनीने कामात कोणताही बदल केलेला नाही.
“नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेले हे बांधकाम केवळ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत नाही, तर रेल्वे वाहतुकीसाठीही धोकादायक आहे. प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी,“ अशी मागणी संजय सावंत यांनी केली आहे. या तक्रारीची प्रत आरसीएफ थळचे महाव्यवस्थापक आणि रायगड जिल्हाधिकारी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.
आता केंद्र सरकारची नवरत्न कंपनी आणि जिल्हा प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
रेल्वे मार्गिकेच्या इतक्या जवळ सुरू असलेल्या बांधकामामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरसीएफ ही एक महत्त्वाची राष्ट्रीय संस्था असल्याने त्यांच्या मालकीच्या रेल्वे मार्गिकेची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.