Raigad traffic disruption pudhari photo
रायगड

Raigad News: अलिबाग-साळाव मार्गावरील वाहतूकबंदीच्या 'खेळा'त प्रवाशांचे मरण

विद्यार्थ्यांच्या बसेसचा प्रवास मृत्यूच्या छायेत; पाल्हेच्या धाेकादायक पुलावर वाहतुकीचा ताण; मोठ्या अपघाताची भीती

पुढारी वृत्तसेवा

रायगड : अलिबागवरून साळाव येथील 'जेव्हीएम' शाळेत जाणाऱ्या शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांच्या स्कूलबसना ये-जा करण्यासाठी सध्या एकही सुरक्षित मार्ग शिल्लक राहिलेला नाही. रस्ता किंवा पूल धोकादायक झाला की थेट वाहतूक बंदीचा आदेश काढायचा, एवढीच सोपी भूमिका प्रशासनाने घेतल्यामुळे अलिबाग-नागावमार्गे रेवदंडा-साळावकडे जाणाऱ्या प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल बेहाल झाले आहेत. याबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजनांची मागणी होत आहे.

एकीकडे एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द झाल्या असताना, दुसरीकडे बंदी आदेशाला केराची टोपली दाखवत धोकादायक पाल्हे (नागाव) पुलावरून अवजड वाहनांची बिनदिक्कत वाहतूक सुरू असल्याने येथे कधीही मोठा अपघात घडण्याची भीती निर्माण झाली आहे.

तीनही मुख्य मार्ग ठरले धोकादायक

सध्या अलिबाग ते रेवदंडा-साळाव दरम्यान जोडणारे सर्वच पर्यायी मार्ग प्रशासकीय दुर्लक्ष आणि नियोजनाच्या अभावामुळे खिळखिळे झाले आहेत. काही दिवसांपूर्वी रस्त्याची झालेली दुरवस्था आणि एका भीषण अपघातामुळे खानावचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे, सुरक्षेच्या कारणास्तव बेलीच्या पुलाजवळची जड वाहनांची वाहतूक देखील प्रशासनाने बंद केली आहे. हे दोन्ही मुख्य मार्ग एकाच वेळी बंद झाल्यामुळे आता संपूर्ण अवजड वाहतूक सहाण बायपास मार्गे हटाळ्यावरून जाणाऱ्या पाल्ह्याच्या (नागाव) अरुंद आणि अत्यंत मोडकळीस आलेल्या पुलावरून वळवण्यात आली आहे.

पाल्हे पूल बनतोय 'डेथ ट्रॅप'; स्कूलबसेस धोक्यात

पाल्हे येथील पूल हा एरवीही जड वाहनांच्या वाहतुकीसाठी योग्य आणि सुरक्षित नाही. असे असताना खानाव आणि बेलीचे मार्ग बंद झाल्याने या पुलावरील अवजड वाहतुकीचा ताण तब्बल तिप्पट वाढला आहे. याच मोडकळीस आलेल्या पुलावरून जेव्हीएम शाळेच्या स्कूलबसेस, जेएसडब्ल्यू कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या बसेस आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या एसटी बसेस जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालक करत आहेत.

दरम्यान, अलिबाग तालुक्यातील जुन्या आणि जीर्ण पुलांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. खानाव आणि काशिदसारख्या ठिकाणी पूल खचणे किंवा कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. अलिबाग तालुक्यात वाढते शहरीकरण तसेच वाढते पर्यटन यामुळे वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच काही भागातील मोठ्या उद्योगांसाठी येथे अवजड वाहतूक होत असते. त्यामुळे आहे त्या जुन्या पुलांवर वाहतुकीचा ताण येत आहे. तालुक्यातील काही पूल हे नादुरुस्त आहेत. पाऊस सुरु झाल्यानंतर येथे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता असते. यातून या धोकादायक पुलांवर ताण वाढत आहे. यासाठी जुन्या पुलांना नवीन पर्यायी पूल होणे आवश्यक आहे.

लोकप्रतिनिधींच्या इशाऱ्याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर यांनी पाल्हे पुलाच्या खालावलेल्या स्थितीबाबत आणि दुरवस्थेबाबत वेळोवेळी लेखी व तोंडी निवेदनांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, ढिम्म प्रशासनाने अद्याप यावर कोणतीही ठोस उपाययोजना केलेली नाही. नेहमीप्रमाणे एखादी दुर्दैवी घटना घडेपर्यंत प्रशासन सुस्त राहणार आणि अपघात झाल्यावर बचावात्मक पवित्रा घेऊन एकमेकांकडे बोट दाखवणार का? अशी विचारणा स्थानिक नागरिक करत आहेत.

तत्काळ तोडगा काढण्याची मागणी

केवळ कागदी घोडे नाचवून 'वाहतूक बंदी'चे आदेश काढण्यापेक्षा प्रशासनाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला पाहिजे. लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येत तत्काळ हस्तक्षेप करून या मार्गावरील प्रवाशांना आणि शाळकरी मुलांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी तीव्र मागणी आता रायगडकरांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT