महाड: मागील आठवड्यात व्यावसायिक सिलेंडर दराच्या किंमतीमध्ये शासनाने केलेली मोठी वाढ लक्षात घेता याच प्रमाणात शासनाने आता सिलेंडर पुरवठाही योग्य पद्धतीने अधिक प्रमाणात करावा अशी मागणी महाडमधील व्यवसायधारकांनी शासनाकडे केली आहे.
व्यवसाय सिलेंडर दरामध्ये दोन हजार पेक्षा झालेल्या वाढीने आता ही किंमत तीन हजारच्या घरात पोचली आहे. यामुळे महाड शहरातील काही हॉटेलमधून चहासह काही अन्नपदार्थ बंद करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
यासंदर्भात महाडमधील काही हॉटेल मालकांशी चर्चा केली असता आवश्यक असलेल्या प्रमाणात सिलेंडरचा पुरवठा होत नसल्याने चहा व मोजकेच अन्नपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध केले जात असल्याचे त्यांनी मान्य केले.
शासनाने मोठ्या फरकाने व्यवसाय सिलेंडरच्या किमतीमध्ये केलेली वाढ ही दुर्दैवी व लहान व्यवसाय धारकांसाठी कंबरडे मोडणारी असून अनेक छोटे हॉटेल व्यावसायिक व टपरी धारकांना आपला व्यवसाय दुर्दैवाने बंद करण्याची वेळ आगामी काही काळात येईल अशी भीती व्यक्त केली.
आखात प्रदेशात सुरू असलेल्या युद्धाचे दूरवर परिणाम होण्याचे संकेत शासनाकडून देण्यात आले असून या पार्श्वभूमीवर व्यवसाय सिलेंडरमध्ये झालेल्या वाढीप्रमाणेच सिलेंडरचा अतिरिक्त पुरवठा करण्याची ही जबाबदारी शासनाने घ्यावी व लहान व्यवसाय धारकांसह हॉटेल चालक व्यवसाय धारकांना अन्नपदार्थाच्या दरात वाढ करावी लागणार नाही. याकडे गंभीरपणे लक्ष द्यावे असे महाडमधील व्यवसाय धारकांकडून शासनाला सुचविण्यात आले आहे.