तळाः संध्या पिंगळे
तळा शहरातील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील वाढत्या कचऱ्याच्या समस्येमुळे सध्याचे डम्पिंग ग्राउंड प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून, त्याचे स्थलांतर नेमके कोणत्या कारणामुळे रखडले आहे, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तळा नगरपंचायती कडून शहरातील ओला व सुका कचरा एकत्रितपणे तळा धरणा जवळील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात येतो. मात्र या ठिकाणी आवश्यक त्या मूलभूत सुविधा व सुरक्षेची उपाय योजना नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. डम्पिंग ग्राउंडभोवती संरक्षक भिंत नसल्यामुळे मोकाट गुरे, कुत्रे तसेच पक्षी अन्नाच्या शोधात येथे मोठ्या प्रमाणात येत असतात.
कचऱ्यातील उरलेले अन्न खाताना प्लास्टिकही जनावरांच्या पोटात जात असल्याने त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची चर्चा नागरिकांतून व्यक्त होत आहे. डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात येणारा ओला-सुका कचरा कुजल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून, त्याचा फटका नागरिकांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे या परिसरा लगतच तहसील कार्यालय असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत आहे.
नगरपंचायतीच्या मालकी हक्काच्या अंबेळी येथील जागेत नवीन डम्पिंग ग्राउंड उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र राणेची वाडी व अंबेळी ग्रामस्थांकडून होत असलेल्या विरोधामुळे त्या ठिकाणी कचरा प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही. परिणामी आजही धरणाशेजारील जुन्याच ठिकाणी शहरातील कचरा टाकण्यात येत आहे.
याबाबत मुख्याधिकारी मनिषा वजाळे यांनी सांगितले की, “अंबेळी येथे नवीन डम्पिंग ग्राउंडचे काम पूर्ण झाले असून लवकरच शहरातील कचऱ्याचे तेथे विघटन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच सध्याच्या डम्पिंग ग्राउंडवरील कचराही टप्प्याटप्प्याने अंबेळी येथे हलवून त्याचे विघटन केले जाणार आहे.” तथापि, वाढते प्रदूषण, दुर्गंधी आणि आरोग्याचा धोका लक्षात घेता हा प्रश्न प्रशासनाने तातडीने मार्गी लावण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
पाणीपुरवठ्यावर परिणाम
डम्पिंग ग्राउंडच्या शेजारीच शहरातील मोठ्या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी बोअरवेल उभारण्यात आली असून, कचऱ्यातून निर्माण होणारे दूषित पाणी जमिनीत मुरत असल्याने पाणीप्रदूषणाचा धोकाही निर्माण झाला आहे. शकते. कुजणाऱ्या कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या घाण पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांकडून तातडीने डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.