सिडकोच्या महागड्या घरांच्या किंमती कमी होणार pudhari photo
रायगड

CIDCO housing prices : सिडकोच्या महागड्या घरांच्या किंमती कमी होणार

घरांच्या अवाच्या सव्वा किंमतींवर सिडको अधिकाऱ्यांची झाडाझडती; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : विक्रम बाबर

सिडकोच्या घरांच्या अवास्तव आणि सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या किंमतींच्या मुद्द्यावर आमदार विक्रांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर सिडको प्रशासनाला धक्का बसला आहे. आमदार विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला घरांच्या किंमतींचा तात्काळ पुनर्विचार करण्याचे स्पष्ट आदेश दिले.

सिडकोकडून जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या किंमती या सामान्य मध्यमवर्गीय व गरजू नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याचा मुद्दा आमदार विक्रांत पाटील यांनी ठामपणे मांडला. “परवडणाऱ्या घरांसाठी असलेली योजना हीच जर महाग झाली, तर ती योजना कुणासाठी?” असा थेट सवाल त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना विचारला.

आ. विक्रांत पाटील यांनी सिडकोचेच सर्व नियम, ठराव याचा सिडकोलाच कसा विसर पडला आहे हे अधिकाऱ्यांना दाखवून दिले. सर्व पुराव्याणीशी सिडको अधिकाऱ्यांनी कश्या चुकीच्या पद्धतीने घरांच्या किमती आकारल्या आहेत व त्या किमती कशा कमी करता येतील हे पटवून दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्पष्ट भूमिका घेत सिडकोच्या महागड्या घरांच्या किंमतीत बदल करण्याचे निर्देश दिले. सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशाच दरात घरे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सिडकोची असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, या विषयावर तत्काळ पुढील बैठक घेऊन सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

नागरिकांच्या हितासाठी किंमती कमी करण्याचा ठोस निर्णय व्हावा, यासाठी आमदार विक्रांत पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सिडकोच्या मनमानी कारभाराविरोधात आमदार विक्रांत पाटील यांनी उचललेला हा आवाज म्हणजे सर्वसामान्य घरकुलधारकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

  • बैठकीदरम्यान सिडकोच्या काही अधिकाऱ्यांनी अवाच्या सव्वा किंमती मांडण्याचा प्रयत्न केला असता आमदार विक्रांत पाटील यांनी तीव्र शब्दांत त्यांचा समाचार घेतला. नागरिकांच्या भावनांशी खेळ करू नका, सिडकोचा मूळ उद्देश विसरू नका, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT