खाडीपट्टा : रघुनाथ भागवत
महाड-म्हाप्रळ दरम्यानच्या मार्गावर कित्येक ठिकाणी मोऱ्या, पुलांची कामे अपूर्ण आहेत. त्यामध्ये चोचिंदे येथील दगडी पूल पाडण्यात आला आहे. त्या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी होणार आहे.
राजेवाडीफाटा ते आंबडवे महामार्गावर काँक्रीटीकरण जवळजवळ पूर्णत्वाला जाण्याच्या दिशेला असून तसेच महाड-म्हाप्रळ मार्गावर ओवळे ते शिरगावफाटा येथपर्यंत असलेल्या डांबरीकरण मार्गावर मोऱ्या आणि पुलांच्या कामामुळे कित्येक ठिकाणी मार्गाचे काम अपूर्ण असून अगोदरच धिम्यागतीने सुरु असलेले दोन पदरी महामार्गाचे काम नागरिकांना त्रासदायक ठरला आहे. अनेक अपघाताच्या घटना घडल्या असून आजच्या स्थितीला देखील सदर महामार्गावर बरेच काम अपूरे आहे. या मार्गावरील मुख्य असणार रावढळ पुलाचे काम देखील झालेले नाही, तसेच तेलंगे मोहल्ला येथील रस्ता, सव गावाजवळील मोऱ्यांचे काम अपूरे आहे.
या मार्गावर असलेले पुल हे दगडी बांधकामाचे पुल होते त्यामध्ये चिंभावे, तेलंगे येथील पुलाचे काम ऐन पावसाळा सुरु झाला असताना चालु होते त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. सद्यस्थितीला चोचिंदे वनीकोंड लगत असलेल्या दगडी पुलाचे काम सुरु करण्यासाठी त्याला नुकतेच जमीनदोस्त करण्यात आले आहे. पूल पाडण्यात आल्याने प्रवासाला कोणताही अडथळा येऊ नये याकरिता पुलाच्या बाजूनेच मातीचा भराव करून वाहतूक सुरळीत सुरु ठेवण्यात आली आहे, मात्र पुलाचे काम तात्काळ होणे गरजेचे आहे.
तसेच या पुलाबरोबरच मार्गावरील मोऱ्यांचे काम तसेच मुख्य रावढळ पुलाचे काम देखील तात्काळ सुरु होणे गरजेचे आहे, अन्यथा जेवढे उशीरा काम सुरु होईल आणि पावसाळयात नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे संबधित राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ रावढळ पुलाच्या कामाकडे देखील लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सावित्री पुल उद्घाटन प्रसंगी भूमिपूजन करण्यात आलेल्या या महामार्गाच्या कामाला खरे तर 2019 साली सुरुवात करण्यात आली. त्यानंतर या महामार्गाचे काम अतिशय संथगतीने सुरू होते. या दरम्यान स्थानिक नागरिकांना, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या. सद्यस्थितीला काम पूर्णत्वाला जात असताना देखील ठेकेदाराकडून धिम्या गतीने काम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
या मार्गावर अनेक मोऱ्या आणि पुलाचे काम अजून देखील बाकी आहे हे काम कधी पूर्णत्वाला जाईल असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला असून येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत तरी हे काम पूर्णत्वाला जावे अशी माफक मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
सावित्री नदीवरील नवीन पुलाच्या उद्घाटन प्रसंगी 2017 साली राजेवाडीफाटा येथे दोन पदरी रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेल्या आंबडवे ते राजवाडीफाटा या नवीन राष्ट्रीय महामार्गाची त्यावेळी घोषणा करण्यात आली. त्यानंतर सुरू झालेले काम 2019 पर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा करण्यात आली होती, मात्र हे काम धिम्यागतीने सुरु असून अजून काम पूर्ण झालेले नाही.