Raigad Fort Chhatrapati Shivaji Maharaj's 351st Rajyabhishek ceremony
नाते : इलियास ढोकले
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५१ वा तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा व या निमित्ताने जागर शौर्यभक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन उद्या ६ जून रोजी किल्ले रायगडावरील राज दरबार व परिसरामध्ये संपन्न होत आहे. या राज्याभिषेकाचे आयोजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून केले जात आहे या राज्याभिषेक सोहळा रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती राहणार आहे.
या निमित्ताने आज ५ जून व उद्या ६ जून रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन संयोजकांमार्फत करण्यात आले आहे. यामध्ये आज दुपारी साडेतीन वाजता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या समाधीस अभिवादन करून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रारंभ करण्यात येणार आहे, दुपारी चार वाजता संभाजी राजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत नाणे दरवाजा येथे तमाम शिवभक्तांच्या वतीने करण्यात येईल.
त्यानंतर सर्व शिवभक्त आणि समवेत गडारोहणास प्रारंभ होईल सव्वाचार वाजता नगर खाना येथे गडपूजन साडेचार वाजता युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्या हस्ते धार तलवारीची युद्ध कला महाराष्ट्राची या युद्ध कलेच्या प्रात्यक्षिकास होळीच्या माळावर सुरुवात होईल. सायंकाळी सात वाजता ढोल वादन, लेझीम प्रात्यक्षिक आणि वारकरी संप्रदायाकडून टाळ मृदंगाचा गजरात होळीच्या माळावर कार्यक्रम संपन्न होणार आहे. रात्री आठ वाजता राज सदरेवर जागर शिवशाहीरांचा स्वराज्याचा इतिहासाचा हा शाहिरी कार्यक्रम सादर होईल.
रात्री नऊ वाजता शिरकाई देवी मंदिराजवळ गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ, साडेनऊ वाजता जगदीश्वर मंदिरात वारकरी संप्रदायांकडून कीर्तन व भजन आयोजित करण्यात आले आहे.
सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिनी सकाळी सात वाजता युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते नगरखाना येथे ध्वज पूजन ध्वजारोहण, राजसद्रेवर साडेसात वाजल्यापासून शाहिरी कार्यक्रमास सुरुवात होईल. साडेनऊ वाजता श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राज्यसभेवर आगमन होऊन नऊ ४५ वाजता संभाजी राजे छत्रपती व युवराज शहाजीराजे छत्रपती यांचे राज्यसभेवर आगमन होणार आहे.
त्यानंतर या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपती महाराजांच्या उत्सवमूर्तीस अभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यसभेवरील सिंहासनारूढ मूर्तीस सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात येणार आहे. सकाळी साडेदहा वाजता संभाजी राजे छत्रपती शिवभक्तांना संबोधित करतील, अकरा वाजता सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा या शिवराज्याभिषेक पालखी सोहळ्यास प्रारंभ होईल जगदीश्वर मंदिरात संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून वारकरी संप्रदायास पंढरीच्या वारीसाठी मानाचा ध्वज प्रदान करण्यात येईल.