Raigad Political Row Pudhari
रायगड

Raigad Political Row: महसुलमंत्र्यांच्या कार्यक्रमात सेना-राष्ट्रवादीत रंगले मानापमान नाट्य; कार्यक्रमातील प्रोटोकॉलवरून तटकरे संतापले

शिवसेनेचा पलटवार, महसुलमंत्र्यांची दिलगिरी

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: रायगडच्या पालकमंत्रीपदाचा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना, असा वादंग सुरू असतांनाच महसुलमंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनात मंत्री आदिती तटकरे आणि खासदार म्हणून मला विश्वासात घेतले नसल्याच्या मुद्द्यावरून जाहीर भाषणार सुनिल तटकरेंनी व्यक्त केलेली नाराजी आणि मंत्री भरत गोगावले यांनी त्याला दिलेले प्रतिउत्तर यामुळे निर्माण झालेल्या वादावर महसुलमंत्र्यांनी दिलगीरी व्यक्त करून पडदा टाकला.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत शनिवारी येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र जिल्हा प्रशासनाने संबंधित कार्यक्रम आयोजित करताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही, तसेच त्यांची मते जाणून घेतली नाहीत. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात नाराजी व्यक्त केली.

अखेरीस महसूलमंत्री बावनकुळे यांनी आपल्या भाषणात कार्यक्रम आयोजनात आदिती तटकरे, भरत गोगावले, सुनील तटकरे तसेच इतर लोकप्रतिनिधींना त्रास झाला आहे. याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो.

यापुढे असे पुन्हा घडणार नाही असे स्पष्ट करीत घडलेल्या प्रकारावर पडदा टाकला. त्यांच्या नंतर आदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात जिल्हा प्रशासनाने या कार्यक्रमाचे आयोजन करताना आमची मते जाणून घेतली असती तर बरे झाले असते. आम्ही चांगल्याच सूचना केल्या असत्या असे नमुद करुन, आपली नाराजी व्यक्त केली.

खासदार सुनील तटकरे यांनी सुनावले खडेबोल

खासदार सुनील तटकरे यांना राजशिष्टाचारानुसार निमंत्रण मिळाले नाही यावरुन त्यांनी आपल्या भाषणात जाहिर नाराजी व्यक्त करत, सरकारी अधिकाऱ्यांना राजशिष्टाचार शिकवावा लागेल, असे खडे बोल सुनावले.

कार्यक्रमाचे आयोजन करताना जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांना कोणतीही कल्पना दिली नाही. तसेच अभियाना बाबत सूचना व मते जाणून घेतली नाहीत. कार्यक्रमाचे नियोजन पूर्ण झाल्यानंतर केवळ लोकप्रतिनिधींना निमंत्रण पत्रिका देत सोपस्कार उरकण्यात आल्याने खासदार तटकरे यांनी ही जाहिर नाराजी व्यक्त केली.

खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात हा कार्यक्रम आयोजित करताना प्रशासनाकडून काही चुका झाल्या आहेत. ते मी आपली भेट झाल्यानंतर सांगेन, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितले.

आता आमचेही ऐका : मंत्री भरत गोगावले

खासदार तटकरे यांच्या भाषणानंतर ते महसुल मंत्री बावनकुळे यांच्या शेजारी जावून बसले व त्यांच्याशी बोलत होते. त्याचवेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले हे भाषणास उभे राहीले. त्यावेळी मंत्री गोगावले यांनी, आम्ही तुमचे ऐकले आता आमचे ऐका, असे खा.तटकरे यांचे नाव न घेता सुनावल्याने व्यासपीठावर काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अडीच वर्षांच्या सरकारमध्ये मंत्रिपद सोडणारा मी एकमेव आमदार होतो. आजही आदेश मिळाला तर क्षणाचाही विलंब न लावता मंत्रिपदाचा राजीनामा देईन. जनता जोपर्यंत जबाबदारी देईल, तोपर्यंत काम करत राहीन, असे सांगत गोगावले यांनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT