श्रीवर्धन शहर ः महाराष्ट्रात नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.श्रीवर्धन नगर परिषदही त्यात आहे.नगराध्यक्षांची निवड थेट नागरिकांकडून होणार असून 10 प्रभागांच्या 20 सदस्यांची निवड त्या-त्या प्रभागातील मतदार करणार आहेत.श्रीवर्धन नगर परिषदेचा कारभार गेली काही वर्षे प्रशासकांकडेच होता. आता ब-याच कालावधीनंतर सार्वत्रिक निवडणुक होत आहे.
प्रशासक राजवट लागू होण्यापूर्वी श्रीवर्धन नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉन्ग्रेस (अजित पवार गट) पक्षाचीच सत्ता होती. आता 2 डिसेंबर 25 रोजी होणा-या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष सर्व मतदारांकडून आणि 20 नगरसेवक आपापल्या प्रभागातून निवडून येतील.
मावळत्या बॉडीकडून व प्रशासकीय कारकीर्दीत खा.सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून शहरात, समुद्र किनारी अनेक विकास कामे झाली आहेत यात दुमत असण्याचे कारण नाही. तरीही नवीन निवडून येणा-या बॉडीपुढे शहरातील उर्वरित व प्रलंबित अशा काही गंभीर प्रश्नांची आव्हाने उभी असतील.
यापैकी सर्वात प्राधान्यक्रमाची समस्या म्हणजे शहरात वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक कोंडी, श्रीवर्धन बीचचे अनेक प्रकारांनी सौंदर्यीकरण झाल्यापासून पर्यटकांची संख्या अफाट वाढली आहे आणि त्यांच्या वाहनांच्या गर्दीला शहरातील अरुंद रस्ते अपुरे पडतात ही वस्तुस्थिती आहे.त्यावरील उपाय म्हणजे रस्ते रुंदीकरण करणे आणि बाह्य़वळण रस्ता तयार करणे हे प्राधान्यक्रमाचे काम आहे.
दुसरी समस्या म्हणजे जलशुद्धीकरण प्रकल्प होऊनदेखील ब-याच वेळा पाण्याच्या पाईप लाईन फुटतात व त्यामुळे नागरिकांना वेळेवर पाण्याचा पुरवठा होत नाही.यावर स्थायी स्वरुपाच्या उपाययोजनेची गरज आहे. तिसरी समस्या म्हणजे बैल, घोडे, गाढव इ. प्राण्यांच्या व अन्य मोकाट जनावरांच्या रस्त्यावरील मुक्त संचारामुळे होणा-या त्रासाचा आणि त्यामुळे होणा-या वाहतूक कोंडीवर प्रभावी अशी उपाययोजना करणे.
श्रीवर्धन नगर परिषदेचा पूर्वी कोंडवाडा होता परंतु त्या जागी आता न.प.चे सुसज्ज विश्रामगृह झाल्यामुळे आता कोंडवाडा नाहीच. चौथी समस्या म्हणजे नगर परिषद हद्दीमध्ये कोठेही अधिकृत आणि पुरेसा मोठा वाहनतळ नसल्यामुळे नागरिक नाइलाजाने रस्त्याच्या बाजूला कोठेही वाहने उभी करतात आणि त्यामुळे अधिकाधिक वाहतूक कोंडी होते. अशा रीतीने श्रीवर्धन नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीनंतर नवीन येणा-या बॉडीला वरील समस्यांवर तातडीने उपाययोजना करावी लागणार आहे हे निश्चित.