रायगड

Konkan Railway : मध्य रेल्वेने निसर्गाचे आव्हान निभावले; मुंबई - पुणे रेल्वे संपर्क यशस्वीरीत्या पूर्ववत

११,००० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रम; लोणावळा घाट विभागातील तिन्ही मार्ग पूर्ववत

पुढारी वृत्तसेवा

रोहे : मध्य रेल्वेने कर्जत - लोणावळा या अतिशय कठीण आणि धोकादायक घाट विभागातील तिन्ही रेल्वे मार्ग अप, डाऊन आणि मध्य यशस्वीरीत्या दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत केली आहे. अत्यंत प्रतिकूल हवामानात २३ दिवस चाललेल्या अथक मोहिमेनंतर, खंडाळा आणि मंकी हिल दरम्यानच्या 'अप' मार्गावरील शेवटचा तांत्रिक अडथळा दूर करून तो मार्ग सुरक्षित करण्यात आला. २८ जुलै रोजी सायंकाळी ५ :४२ वाजता रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली.

५ जुलै रोजी झालेला ३२७ मिमी पाऊस व ६ जुलै रोजी झालेला ६०० ते ६७० मिमी इतका प्रचंड पाऊस यामुळे लोणावळा, कर्जत विभागातील अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या, ज्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला. तिन्ही मार्गांवर (अप, डाऊन आणि मध्य) परिणाम झाल्यामुळे ६ जुलै ते २८ जुलै या कालावधीत अनेक गाड्यांचे रद्दीकरण, शॉर्ट टर्मिनेशन, शॉर्ट ओरिजिनेशन, मार्ग बदलणे आणि वेळापत्रकात बदल करणे यांसारखे निर्णय घ्यावे लागले. यामुळे सुमारे ६६५ गाड्यांवर परिणाम झाला. तरीही, या विभागात सतत पाऊस पडत असतानाही, मध्य रेल्वेच्या टीमने आव्हानात्मक परिस्थितीचा धैर्याने सामना केला आणि युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले

ही दुरुस्ती मोहीम म्हणजे निसर्गाच्या कोपाविरुद्धचा एक कठीण लढा होता. ६ जुलै पासून, घाट विभागात सतत मुसळधार पाऊस पडत होता. ज्यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, मोठे खडक पडणे, रेल्वे मार्गाच्या बाजूचे भराव खचणे यांसारख्या घटना घडल्या. सुरुवातीला दरड, माती, हटवल्यानंतरही सततच्या पावसामुळे पुन्हा माती, दगड कोसळण्याचे प्रकार घडत होते. ज्याचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागला. ८ जुलै रोजी ही सततच्या पावसामुळे नव्याने दरडी कोसळल्या. पुढील नुकसान टाळण्यासाठी, अभियंत्यांनी पावसाचे पाणी आत जाण्यापासून रोखण्यासाठी आणि मातीची धूप थांबवण्यासाठी धोकादायक उतार आणि पावसाच्या पाण्यामुळे पडलेल्या भेगांवर मोठ्या प्रमाणावर ताडपत्री अंथरली.

दहा अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी झालेले नुकसान व्यापक आणि तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे होते. खंडाळा मंकी हिल (अप मार्ग) हे सर्वात जास्त बाधित झालेले ठिकाण होते. येथे १३० मीटर लांबीच्या पट्ट्यात जमिन खचली होती. यात रेल्वे मार्ग ज्या मातीच्या बांधावर होता. तो बांध ४ मीटरपर्यंत खाली खचला होता. ज्यामुळे रुळाखालचा आधार पूर्णपणे नाहीसा झाला होता. मंकी हिल ठाकूरवाडी (डाऊन मार्ग) २०० मीटर उंच टेकडीवरून दरड कोसळल्यामुळे एक प्रचंड मोठा खडक संरक्षक भिंतीवर आदळला. यामुळे भिंत कोसळली आणि ५० मीटर लांबीचा रेल्वे मार्ग २० मीटर खोलीपर्यंत वाहून गेला होता. बोगदा क्र. ५१ (मध्य आणि अप मार्ग) पावसाच्या प्रचंड प्रवाहामुळे बोगद्यात पाणी साचले होते. यामुळे रुळाच्या बाजूचा खडीचा थर वाहून गेला आणि रेल्वे मार्गाची रचना अस्थिर झाली.

अशा परीस्थितीत आव्हानपूर्ण पुनर्स्थापना कार्य -११,७०० पेक्षा अधिक कर्मचारी, ४० यंत्रे आणि १,४०,९४० 'मॅन-आवर्स घेऊन हे आव्हान उचलण्यासाठी मध्य रेल्वेने ११,७४५ कर्मचाऱ्यांचे (यात २,५१४ विभागीय कर्मचारी आणि ९,२३१ कंत्राटी कामगारांचा समावेश होता) अभूतपूर्व मनुष्यबळ तैनात केले. २३ दिवसांच्या कालावधीत 'युद्धपातळीवर' अहोरात्र (२४/७) काम करून, सुरक्षितता आणि कामाची जलद प्रगती सुनिश्चित करण्यासाठी या टीमने अंदाजे १,४०,९४० 'मॅन-आवर्स' इतके श्रमदान केले.

या कामासाठी तैनात केलेली यंत्रसामग्री मध्ये १८ जेसीबी,२० पोकलेन एक्स्कॅव्हेटर्स (यात २ विशेष 'लाँग-बूम' पोकलेनचा समावेश होता), पाइलिंगसाठी 'रिग' मशीन आणि अनेक डंपर्स. भराव आणि स्थिरीकरणासाठी वापरलेले साहित्यात ४६,४६० घनमीटरपेक्षा जास्त ग्रॅन्युलर सब-बेस आणि २,६०० घनमीटर मोठे दगड इत्यादीचा समावेश आहे.

अत्याधुनिक संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या साहित्यामध्ये ८,४१८ मीटर सेल्फ-ड्रिलिंग अँकर्स, १,८०० चौरस मीटर उच्च-क्षमतेची जाळी (जिओमॅट), १,७०० घनमीटर गॅबियन भिंती आणि ७,५०० वाळूची पोती यांचा समावेश आहे. हे साहित्य रस्तेमार्गाने अजिबात पोहोचता न येणाऱ्या ठिकाणांपर्यंत साहित्य पोहोचवण्यासाठी ११० पेक्षा अधिक रेकचा वापर करण्यात आला.

मध्य मार्ग ७ जुलै २०२६ रोजी आणि 'डाऊन मार्ग' १४ जुलै २०२६ रोजी पूर्ववत करण्यात आली होती, तरीही 'अप मार्ग' पूर्ववत करणे हे अधिक आव्हानात्मक काम ठरले. मध्य रेल्वेच्या समर्पित टीमने २८ जुलै २०२६ रोजी 'अप मार्ग' वाहतुकीसाठी सज्ज केली. तात्पुरती दुरुस्ती पूर्ण झाली असली तरी, दीर्घकालीन सुरक्षितता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांचे काम आधीच सुरू आहे. यामध्ये संवेदनशील ठिकाणी १२०० मिमी व्यासाचे 'बोर्ड कास्ट-इन-सिटू पाइल्स' आणि आरसीसी रिटेनिंग भिंतींच्या बांधकामाचा समावेश आहे.

मुंबई आणि पुणे यांना जोडणारी ही महत्त्वपूर्ण जीवनवाहिनी पूर्ववत करण्यासाठी जीवघेण्या हवामानाचा आणि कठीण भूप्रदेशाचा सामना करणाऱ्या पर्यवेक्षक, अभियंते आणि कामगारांबद्दल मध्य रेल्वे अत्यंत कृतज्ञता व्यक्त करते.हे आव्हान निभावताना आणि झालेल्या गैरसोयीबद्दल प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांच्या समजूतदारपणाची आणि सहकार्याचीही दखल घेत मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना सुरक्षित, विश्वसनीय आणि आरामदायी सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT