Mumbai Goa Highway Car Bus Collision Couple Injured
कोलाड : मुंबई - गोवा महामार्गावर खांब नजीक कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने समोरील एसटी बसवर कार धडकल्याने अपघात झाला. यात कारमधील चालक व त्याची पत्नी दोघेजण गंभीर जखमी झाले. यात कार व एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष काशीराम बुधकर (वय ४०) एसटी बस (एम एच ०८ ए पी ५८२५) घेऊन कोलाड महाड दिशेकडे येत होते. तर संतोष मेढेकर कारने (एम एच ०६ बी यू ९९३६) मुंबई कडे जात होते. यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने समोरील एसटी बसवर कार धडकली. यात संतोष मेढेकर व त्यांच्या पत्नी कविता मेढेकर गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी दाखल झाली. कारमधील जखमींना बाहेर काढून सुकेली येथील जिंदाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नागे करीत आहेत.