जयंत धुळप
रायगड: रायगड जिल्ह्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत चालला आहे. अलिबाग तालुक्यातील पोयनाड जवळील मौजे कुरकुंडी कोलटेंभी या गावात सुमारे १८५ वर्षे जुना, ब्रिटिश कालखंडाच्या सुरुवातीचा एक महत्त्वाचा शिलालेख प्रकाशझोतात आला आहे.
एका ऐतिहासिक विहिरीच्या (बारव) बांधकामाशी संबंधित असलेला हा शिलालेख तत्कालीन ग्रामीण समाजजीवन, जलसंस्कृती आणि महसूल व्यवस्थेवर नवा प्रकाश टाकणारा असल्याचे पुणे येथील इतिहास अभ्यासक व प्राचिन शिलालेखांचे वाचक अनिल किसन दुधाणे यांनी दैनिक पुढारी शी बाेलताना सांगीतले.
कुठे आढळला शिलालेख?
कुरकुंडी कोलटेंभी गावाच्या मध्यवस्तीत, तिनविरा नदीच्या किनाऱ्यावर राहणारे नरेश थळे यांच्या घरासमोरील अंगणात फरशीवर हा शिलालेख बसवलेला आहे. पूर्वी हा शिलालेख जवळच असलेल्या एका गोलाकार विहिरीवर (बारव) लावण्यात आला होता.
४२ सेमी लांब आणि ४० सेमी रुंद असलेल्या या दगडावर देवनागरी लिपीत, संस्कृत-मराठी मिश्र भाषेतील सात ओळींचा मजकूर उठावदार अक्षरांमध्ये कोरलेला आहे. अनेक वर्षे हा शिलालेख उघड्यावर असल्याने काही अक्षरे पुसट झाली होती, परंतु त्याचा वैज्ञानिक पद्धतीने छाप (स्केच) घेतला असता हा ऐतिहासिक दस्तऐवज स्पष्टपणे वाचता आला असल्याचे दुधाणे यांनी सांगीतले.
शिलालेखाचे थेट वाचन आणि अर्थ
स्थानिक सहकारी निमिष थळे यांच्या सहकार्याने अनिल दुधाणे यांनी या शिलालेखाचे वाचन केले आहे. शिलालेखावरील मूळ ओळींमध्ये-
" १. श्री २. श्री. स. शके १७६३ प्लवना ३. म संवत्सरे ज्येष्ठ श्रु.||७ तद्दी ४. ने उपनाम औचट काश्यप गौ ५. त्री द्भव लक्षुमणात्मज भास्क ६. र भट येवलेकर वली चरी शु ७. भ भवतु || श्री रस्तु||”
असे नमुद आहे. त्याचा मराठीमध्ये अर्थ- " शालिवाहन शके १७६३ (अर्थात गुरुवार, दिनांक २७ मे १८४१) रोजी, 'प्लव' नाम संवत्सराच्या ज्येष्ठ शुद्ध सप्तमीला, काश्यप गोत्राचे 'औचट' उपनाव असणारे लक्ष्मण यांचे पुत्र भास्कर भट येवलेकर यांनी स्वतःच्या ताब्यातील जमिनीवर लोककल्याणासाठी विहीर (बारव) बांधली. हे कार्य शुभ होवो आणि श्रींची कृपा राहो.” असा असल्याचे दुधाणे यांनी सांगीतले.
ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व
हा शिलालेख केवळ एका विहिरीची नोंद नसून, तत्कालीन इतिहासाचा एक महत्त्वाचा जिवंत पुरावा असल्याचा दावा दुधाणे यांनी केला आहे. शिलालेखात २७ मे १८४१ ही नेमकी तारीख आल्यामुळे हा लेख ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील आहे हे स्पष्ट होते.
या शिलालेखात "औचट", "काश्यप गोत्र" आणि "लक्ष्मणात्मज भास्कर भट येवलेकर" असा स्पष्ट उल्लेख असल्याने, त्या काळातील कुटुंबांची जात, गोत्र, उपनाव आणि सामाजिक रचनेची माहिती मिळते. त्या काळात ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी 'बारव' (पायऱ्यांची विहीर) ही मुख्य व्यवस्था होती.
भास्कर भटांनी लोकहितासाठी ही जलरचना उभारल्याचे समजते, जे तत्कालीन प्रगत दगडी स्थापत्य परंपरेचे दर्शन घडवत असल्याचे त्यांनी सांगीतले. मजकुरात आलेल्या "वली चरी" या शब्दावरून संबंधित व्यक्तीचा त्या जमिनीवरील मालकी हक्क किंवा ताबा स्पष्ट होतो, ज्यामुळे त्या काळातील महसूल व्यवस्थेचा अभ्यास करण्यास मदत होते. लेखाच्या शेवटी असलेले "शुभ भवतु" आणि "श्री रस्तु" हे शब्द दर्शवतात की, त्या काळात सार्वजनिक व लोकहितैषी कामे ही धार्मिक पुण्यकर्म आणि देवभक्तीशी जोडलेली असायची,असेही त्यांनी सांगीतले.
हा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक ठेवा समोर आणण्यासाठी स्थानिक इतिहासप्रेमी निमिष थळे यांनी दुधाणे यांच्या निदर्शनास आणून दिला. अलिबाग परिसरातील या नव्या शोधामुळे इतिहासप्रेमी आणि संशोधकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, रायगडच्या ऐतिहासिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.