पनवेल : स्व.दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ हवाई सेवेसाठीही सज्ज असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या विमानतळावर बोईंग 777-333 (इआर, रजि. के 7066) हे विमान यशस्वी रित्या उतरले आणि त्याने टेक ऑफही केले.
या विमानतळासाठी शंभर टक्के प्रवासी वाहतूक करण्यासाठी आवश्यक नागरी विमान वाहतूक संचालनालयाचा एअरोड्रोम परवानाही नुकताच मिळाला आहे. यापूर्वी अहमदाबादहून एक खासगी जेट प्रवाशांसह विमानतळावर उतरले होते. सोमवारी उद्योगपती गौतम अदानी यांनीही येथे लँड करीत पाहणी केली होती. त्यानंतर बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 14 :08 वाजता बोईंग हे विमान उतरले. त्यानंतर सायंकाळी 16 :17 वाजता दिल्लीसाठी परतीचे उड्डाणही केले. या विमानतळावर वाइडबॉडी प्रवासी विमान उतरण्याची ही पहिली वेळ आहे. यामुळे या विमानतळाच्या कार्यक्षमतेत आणि भविष्यातील आंतरराष्ट्रीय हवाई सेवांच्या मार्गक्रमणात नवा टप्पा सुरू झाला आहे.
विमानतळाच्या धावपट्टी, नेव्हिगेशन प्रणाली आणि सुरक्षा व्यवस्थेची प्रत्यक्ष चाचणी यानिमित्ताने झाली. बोईंग 777 हे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या अंतरावरील दीर्घ उड्डाणांसाठी वापरले जाणारे विमान असून, अशा विमानांची सहजतेने लँडिंग-टेकऑफ क्षमता सिद्ध झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवी मुंबईतून मध्यपूर्व व आशियातील शहरांकडे उड्डाणे सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.
डिसेंबरला व्यावसायिक उड्डाणाला सुरुवात
एअर इंडिया समूहाने नवी मुंबई विमानतळावरून एअर इंडिया एक्स्प्रेसची 20 उड्डाणे होणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. देशातील 15 शहरांसाठी या विमानतळावरून उड्डाणे होणार आहेत. भविष्यात एअर इंडिया समूहाचा या विमानतळावरून 55 ते 60 उड्डाणे करण्याचा मानस आहे.
येत्या 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथून पहिल्या विमानोड्डाणाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर हा विमानतळ परिसर ‘सीआयएसएफ’च्या ताब्यात दिला जाणार आहे.
त्यानंतर 45 दिवस विमानतळ आणि परिसराचे स्कॅनिंग करून ‘सीआयएसएफ’द्वारे सुरक्षित केला जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात व्यावसायिक विमानांच्या उड्डाणाला सुरुवात होणार आहे.