Assault on Police Officer Panvel
पनवेल: जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान पनवेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला. मतमोजणी केंद्रा बाहेर उपस्थित असलेल्या एका भाजप कार्यकर्त्याने संतापाच्या भरात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची गचंडी पकडत हुज्जत घातल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
या प्रकारामुळे मतमोजणी केंद्र परिसरात काही काळ तणाव आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील मतमोजणी केंद्रावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतांची मोजणी सुरू असताना विविध पक्षांचे कार्यकर्ते, उमेदवारांचे प्रतिनिधी तसेच निवडणूक अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकालाबाबत उत्सुकता आणि तणावपूर्ण वातावरण असतानाच एका भाजप कार्यकर्त्याचा पोलिस अधिकाऱ्याशी किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला.
काही वेळातच हा वाद चिघळत गेला आणि संतापाच्या भरात संबंधित कार्यकर्त्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची गचंडी पकडल्याचे प्रत्यक्ष घटनेनंतर मतमोजणी केंद्र बाहेर खळबळ उडाली. काही काळ परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मोठा अनुचित प्रकार टळल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मतमोजणीसारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रक्रियेदरम्यान पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन झाल्याने प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. सहायक पोलिस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधिकाऱ्याशी हुज्जत घालून गचंडी पकडणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.