पनवेल ः पनवेल तालुका पंचायत समितीच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडला असून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे कमळ या समितीवर फुलले आहे. भाजपच्या वतीने करंजाडे गणातून निवडून आलेल्या रंजना सदाशिव वास्कर सभापतीपदी तर आदई गणातून निवडून आलेले भूपेंद्र सदानंद पाटील हे उपसभापती विराजमान झाले आहेत. अनेक दशकांपासून पंचायत समितीवर असलेला शेतकरी कामगार पक्षाचा एकछत्री अंमल आता संपुष्टात आली आहे.
या निवडीनंतर घोषणा, ढोलताशा आणि फटाक्यांच्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी माजी खा. रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, अरुणशेठ भगत, महापौर नितिन पाटील, परेश ठाकूर, प्रितम म्हात्रे यांच्यासह इतर नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सभापती, उपसभापती यांचे अभिनंदन केले. त्यानंतर मार्केट यार्ड येथे त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापला एकही सदस्य निवडून आणता आला नाही. भाजपने 16 पैकी तब्बल 15 सदस्य निवडून आणत शेकापचा अक्षरशः व्हाईट वॉश केला. सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे भाजपने करंजाडे गणातून विजयी झालेल्या रंजना वास्कर यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्या भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या कन्या आहेत. त् उपसभापतीपदी निवड झालेले भूपेंद्र पाटील यांनी मागील टर्ममध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून सक्षम व प्रभावी काम केले आहे.
पंचायत समितीमध्ये सत्ता यावी ही अनेक वर्षांची इच्छा होती, ती पूर्ण झाली. या अनुषंगाने नागरिकांचे काम जलदगतीने आणि योग्यप्रकारे होणार आहेत. या विजयात प्रत्येक कार्यकर्त्याचा सहभाग आहे. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!रामशेठ ठाकूर, माजी खासदार
एवढा मोठा आपण विजय मिळवला असला तरी आपण विनम्र आहोत. 16 पैकी 15 जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले असले तरी पुढच्या वेळी 100 टक्के जागा जिंकायच्या आहेत. महायुतीमधील घटक पक्ष आणि कार्यकर्ते, मतदार, नागरिकांचे आभार.आमदार प्रशांत ठाकूर,