Panvel Municipal Corporation civic issues
पनवेल: पनवेल महापालिकेने लावलेल्या शास्ती माफीसाठी आज भाजपच्या माजी नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
आयुक्त मंगेश चितळे यांच्या दालनाबाहेर बसून माजी नगरसेवकांनी निषेध नोंदवला. आंदोलनकर्त्यांनी पालिकेने लावलेली शास्ती अन्यायकारक असल्याचा आरोप करत ही शास्ती जुलमी असल्याचे सांगितले. आम्ही शास्ती भरूनही वाढीव शास्ती परत मिळत नाही, यामुळे नागरिकांना अन्याय सहन करावा लागतो, असे मत माजी नगरसेवकांनी व्यक्त केले.
पालिका हद्दीत पालिकेने लावलेला कर हा जुलमी आहे, आणि त्यावर लावलेली शास्ती ही देखील जुलमी आहे, पालिका मालमत्ता कर माफ करू शकत नसेल तर, मालमत्ता करावर लावलेली शास्ती शंभर टक्के माफ करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. शास्ती आज माफ झाली नाही तर, पाच नंतर पालिकेच्या गेट वर बसून आंदोलन करून, पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही, असा इशारा आमदारांनी दिला.