खोपोली (रायगड ) : प्रशांत गोपाळे
खोपोली नगरपालिकेच्या निवडणुका येत्या एक ते दीड महिन्यात जाहीर होण्याचे चित्र असून नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण पडल्याने प्रत्येक पक्षाने या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी वर दावा केल्याने महायुतीत बिघाडी होण्याचे चित्र आहे तर मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपाने महायुती मधून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर दावा केल्याने पेच निर्माण झाला आहे. सर्व पक्षाचे स्वतंत्र उमेदवार उभे राहिल्यास भाजपा किंगमेकर च्या भूमिकेत राहणार आहे. महायुती मध्ये शिवसेना शिंदे गट व अजित पवार गट राष्ट्रवादीमध्ये पक्ष फुटीनंतर ही मोठा संघर्ष या आधीच सुरू होता त्यात भाजपाने उडी घेतल्याने महायुती मध्ये मोठा पेच निर्माण होणार आहे.
खोपोली शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीत मागील निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या तिन्ही प्रमुख पक्षाने एक संघ असताना स्वतंत्र उमेदवार दिले होते. यावेळी भाजापाचा बोलबाला नसताना सुशिक्षित मतदारांनी भाजपाला कल दिला होता. मात्र राष्ट्रवादी ने ७६१ मतांची आघाडी घेत विजय संपादन केला. त्यांनतर नाट्यमय रित्या नगरसेवक फोडाफोडीमध्ये शिवसेनेने यश मिळवीत राष्ट्रवादीला धोबीपिछाड करीत उपनगराध्यक्षपद शिवसेनेने मिळविले होते.
आताच्या घडीला विधानसभेच्या निवडणुकीत शिव सेना फुटली असताना भाजपाच्या मदतीमुळे शिवसेनेने चांगलीच आघाडी घेतली हे नाकारता येत नाही. मात्र या पक्षफुटी नंतर खोप ोली शहरात भाजपाने मुसुंडी मारत यशवंत साबळेंसह अविनाश तावडे या अनेक मातब्बरांना भाजपात घेऊन स्वतंत्र ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे भाजपची ताकद
शहरात मोठी झाली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत मोठी ताकत नसताना भाजपाने सुशिक्षित मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल दिला असल्याने भाजपाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी वर भाजपाने दावा केला असल्याची माहिती जेष्ट नेते यशवंत साबळे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे खोपोली शहराच्या भाजपाच्या परिस्थिती बाबतचा अहवाल नुकताच झालेल्या भेटीत दिला आहे. मागील निवडणुकीसाठी झालेल्या फडवणीस यांच्या मोठ्या सभेची आठवणही करून दिली त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ग्रीन सिग्नल दिल्याने भाजपाने आता खोपोली च्या नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे. यामुळे शिंदे गट शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला आहे. मात्र काही ही झाले तरी भाजपा किंगमेकर च्या भूमिकेत राहणार यात शंका नाही.