कोप्रोली उरण (रायगड) : मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय देण्यासाठी तिसरी मुंबई विकसीत केली जात आहे. तिसरी मुंबई हा महाराष्ट्राच्या विकासातील सर्वात मोठा मास्टर प्लान आहे. महायुती सरकारने तिसरी मुंबई चिरनेर साई कर्नाळा या परिसरात विकसित करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु केल्या आहेत. नव्याने विकसीत होणारे तिसरी मुंबई हे शहर मुंबई, दुबई पेक्षा तिप्पट मोठ असेल असा दावा सरकार कडून केला जात आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकू नये असे आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष अँड सत्यवान भगत यांनी गणेशोत्सवाचे औचित्य साधून येथील समाज बांधवांना (शेतकरी वर्गाला) केले आहे.
मुंबई व नवीमुंबई परिसरातील वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरण यातून मार्ग काढण्यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तिसरी मुंबई उभी राहत आहे. इनोव् हेशन हब, एज्यु सिटीसह नवतंत्रज्ञानावरील उद्योगांमुळे हा परिसर नवीन आर्थिक क्षेत्र म्हणून उदयास येईल. राज्य सरकारच्या यंत्रणा या भागाच्या विकासासाठी आपले प्रयत्न करत आहेत.
मात्र, बांधकाम उद्योगाने पुढाकार घेतल्यास इथे दुबई पेक्षाही मोठे आणि चांगले शहर उभारणे शक्य होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर स्पष्ट केले आहे. तसेच बांधकाम उद्योगाने याकामी जागतिक तंत्रज्ञान, गुंतवणूक आणल्यास त्यांना राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
एकंदरीत अटल सेतू मुळे व नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबई शहराचे अंतर हे काही मिनिटांवर येऊन ठेपणार आहे. त्यामुळे तिसर्या मुंबईत एज्यु सिटी च्या माध्यमातून मुंबई व दुबई पेक्षा मोठ शहर चिरनेर साई - कर्नाळा या परिसरात विकसीत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हालचाली सुरू केल्या असल्याने या परिसरातील शेत जमिनीना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमीनी विकण्याचा प्रयत्न करु नये. नाही तर तेल पण गेलं तुप पण गेलं हाती राहील धुपाटणे अशी म्हणण्याची वेळ भूमीहीन झालेल्या शेतकऱ्यांवर आल्या शिवाय राहणार नाही. असे शेवटी मनसेचे तालुकाध्यक्ष अँड सत्यवान भगत यांनी नमूद केले आहे.