Tata Power project Pudhari
रायगड

Tata Power project: टाटा पॉवरच्या ब्लास्टिंगविरोधात ग्रामस्थ आक्रमक; उपोषणाचा इशारा

उदंचन प्रकल्पाच्या त्रासाने तापकीरवाडी, मोरमारे वाडासह धनगरवाडीतील ग्रामस्थ त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

आनंद सकपाळ

नेरळ: भिवपुरी येथील टाटा पॉवरच्या १००० मेगावॅट उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या कामामुळे तापकीरवाडी, मोरमारे वाडा आणि धनगरवाडा येथील ग्रामस्थांना गेल्या दीड वर्षापासून मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्रकल्प परिसरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील ब्लास्टिंगमुळे घरांना हादरे बसत असून, काही घरांना तडे जाण्याची समस्या निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

याशिवाय धुळीचे वाढते प्रमाण, क्रेशर प्लांटचा आवाज, पोकलेन व अन्य यंत्रसामग्रीच्या कर्णकर्कश आवाजामुळे स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या समस्यांवर वारंवार आंदोलने, उपोषणे आणि ग्रामपंचायतीमार्फत पत्रव्यवहार करूनही ठोस तोडगा न निघाल्याने आता ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलन आणि आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणापासून तापकीरवाडी, मोरमारे वाडा आणि धनगरवाडा ही गावे साधारण १०० ते २०० मीटर अंतरावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या परिसरात रात्रंदिवस काम सुरू असल्याने ब्लास्टिंगच्या हादऱ्यांचा घरांवर परिणाम होत असल्याची तक्रार आहे.

तसेच प्रकल्प परिसरातील क्रेशर प्लांटमुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत असून, डोंगरमाथ्यावरून वाहणाऱ्या हवेमुळे ही धूळ गावांमध्ये पसरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घरातील वस्तूंवर धुळीचा थर साचत असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना श्वसनाचा त्रास व अन्य आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

रात्रंदिवस सुरू असलेल्या कामांमुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना शांत झोप घेणेही कठीण झाले आहे. ब्लास्टिंगचे हादरे, यंत्रसामग्रीचा आवाज आणि धुळीच्या प्रदूषणामुळे गावातील रहिवाशांचे दैनंदिन जीवन प्रभावित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि ब्लास्टिंगच्या परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

या समस्यांबाबत ग्रामपंचायतीने वारंवार टाटा पॉवर व्यवस्थापनाकडे पत्रव्यवहार केला असून, ग्रामस्थांनी गेल्या दीड वर्षात दोन ते तीन वेळा आंदोलन आणि उपोषण केल्याचे सांगितले. मात्र, कंपनीकडून आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात समस्यांचे निराकरण होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे.

१७ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार कर्जत, प्रांताधिकारी कर्जत, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत, पोलीस निरीक्षक कर्जत आणि टाटा पॉवर व्यवस्थापन भिवपुरी कॅम्प यांना निवेदन देऊन आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा निर्णय कळविला होता. त्यानंतर सात दिवसांनी टाटा पॉवर व्यवस्थापनाने चर्चेसाठी वेळ दिला.

त्यानुसार २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता कंपनीचे अधिकारी आणि गाव कमिटी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत ग्रामस्थांच्या मागण्या आणि अटी गाव कमिटीने व्यवस्थापनासमोर मांडल्या. मात्र, चर्चेदरम्यान पुन्हा आश्वासन देण्यात आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. वर्षभरापूर्वीही अशाच प्रकारचे आश्वासन देण्यात आले होते; परंतु त्याची पूर्तता न झाल्याने ग्रामस्थांची दिशाभूल होत असल्याची भावना गाव कमिटीने व्यक्त केली.

चर्चेदरम्यान टाटा पॉवर व्यवस्थापनाने भिवपुरी येथील व्यवस्थापन आणि बॉम्बे हाऊस व्यवस्थापनाशी चर्चा करून ग्रामस्थांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी सात दिवसांची मुदत मागितली आहे. या कालावधीत ग्राम कमिटीने मांडलेल्या अटी व मागण्यांबाबत लेखी आश्वासन देऊन त्यांची पूर्तता करण्याचे ठरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

“आम्हाला केवळ आश्वासन नको, तर मागण्यांची लेखी हमी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी,” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. मागण्यांबाबत लेखी निर्णय न दिल्यास आंदोलन अथवा आमरण उपोषण करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

पुढील आमरण उपोषणाची तारीख निश्चित करून त्याबाबत प्रशासनाला पत्रव्यवहाराद्वारे कळविण्यात येणार असल्याचे हेमंत लक्ष्मण नवले आणि तापकीरवाडी, मोरमारे वाडा व धनगरवाडा येथील गाव कमिटी आणि ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT