महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले  Image source by x
रायगड

Flag Hoisting Raigad | भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी शासकीय झेंडावंदन

Republic Day 2026 | शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Bharatshet Gogawale Flag Hoisting Republic Day 2026

महाड : प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या रायगड जिल्ह्यातील शासकीय झेंडावंदन समारंभाचा मान रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांना देण्यात आला आहे. राज्य शासनाने याबाबत अधिकृत परिपत्रक जारी केले असून, या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सामान्य प्रशासन विभागाने दि. २१ जानेवारी २०२६ रोजी काढलेल्या शासन परिपत्रकानुसार, राज्यभर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ सकाळी ९.१५ वाजता एकाच वेळी पार पडणार आहे. या मुख्य कार्यक्रमाला निमंत्रितांना उपस्थित राहता यावे यासाठी सकाळी ८.३० ते १०.०० या वेळेत कोणताही अन्य शासकीय किंवा अर्धशासकीय ध्वजवंदन समारंभ आयोजित करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कार्यालये व संस्थांनी स्वतःचा ध्वजवंदन समारंभ घ्यायचा असल्यास तो सकाळी ८.३० पूर्वी किंवा १०.०० नंतरच घ्यावा, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री यांच्या हस्ते राज्यस्तरीय मुख्य समारंभ होणार असून, विभागीय व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्यांचे मंत्री, राज्यमंत्री किंवा पालकमंत्री राष्ट्रध्वजवंदन करतील.

दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून यापूर्वी तटकरे विरुद्ध गोगावले असा राजकीय संघर्ष रंगला होता. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या आदिती तटकरे यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून तीव्र विरोध झाला होता. त्यानंतर त्यांना हे पद सोडावे लागले होते आणि पालकमंत्रीपदाबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. याआधी रायगड जिल्ह्यातील शासकीय झेंडावंदन आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले होते.

मात्र, यंदाच्या शासन परिपत्रकानुसार मंत्री भरतशेठ गोगावले यांना शासकीय झेंडावंदनाचा मान देण्यात आल्याने, हा निर्णय केवळ समारंभापुरता आहे की पालकमंत्रीपदाबाबत काही संकेत देणारा आहे, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री गोगावले यांचे जिल्ह्यातील राजकीय वजन वाढल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT