Poladpur Landslide Pudhari
रायगड

Poladpur Landslide: पोलादपूरच्या दरडग्रस्त गावांना भरत गोगावले यांची भेट; ३३ कुटुंबांच्या पुनर्वसनाला गती देण्याचे आदेश

दरडग्रस्त कुटुंबांना सुरक्षित जागी पुनर्वसित करण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर: रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील सडे, नाणेघोळ, किनेश्वरवाडी आणि क्षेत्रपाळ या दरडग्रस्त गावांना रायगड जिल्ह्याचे नेते तथा. महाड-माणगाव-पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांनी गुरवारी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.

पोलादपूर तालुक्यातील ही गावे डोंगराळ भागात वसलेली असून दरवर्षी दरड कोसळणे, भूस्खलन आणि पूर परिस्थितीचा मोठा फटका या भागाला बसत असतो. यंदाही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

नाणेघोळ येथे भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाल्याने ३३ कुटुंबांतील ६९ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणी पाहणी करताना नामदार भरत शेठ गोगावले यांनी दरडग्रस्त भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले.

यावेळी क्षेत्रपाळ गावात झालेल्या भीषण भूस्खलनाची पाहणी करताना शेतीचे नुकसानीची तसेच पिण्याच्या पाण्याच्या विहिरी वाहून गेल्याने निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती घेतली. धनगरवाडी परिसरातील धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या काही कुटुंबांचे तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून त्या उपाययोजनांचाही त्यांनी आढावा घेतला.

दिवसभराच्या दौऱ्यानंतरही नामदार भरत शेठ गोगावले यांनी रात्रीच्या काळोखाची पर्वा न करता पोलादपूर तालुक्यातील शेवटचे आणि दुर्गम गाव असलेल्या क्षेत्रपाळ येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली. संकटाच्या काळात नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली.

या पाहणी दौऱ्यादरम्यान तहसीलदार कपिल घोरपडे, बांधकाम विभागाचे अधिकारी, महापारेषण विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, पंचायत समिती सदस्य अविनाश शिंदे, पोलादपूर तालुकाप्रमुख निलेश अहिरे, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, विजय शेलार, विक्रम भिलारे आदी उपस्थित होते.

शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करणार

नामदार भरत शेठ गोगावले यांनी दरडग्रस्त भागातील कुटुंबांचे सुरक्षित स्थळी पुनर्वसन, बाधितांना शासनाकडून तातडीची मदत आणि नुकसानग्रस्त कुटुंबांना योग्य ती नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT