महाड/अलिबाग ः शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या नोटांचा व्हीडिओ शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्हायरल केल्यावरुन शिवसेना शेकाप राजकारण तापले आहे. गुरुवारी शिवसेनेने चित्रलेखा पाटील यांच्या फोटोला जोडे मारुन निषेध आंदोलन केले. त्यावर चित्रलेखा पाटील यांनी पलटवार करताना, माझ्या फोटोला चप्पल मारुन आणि माझा निषेध करुन शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले यांचा भ्रष्टाचार लपणार नाही. त्यांच्या व्हायरल झालेल्या नोटांच्या बंडलांच्या व्हीडिओची केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून सखोल चौकशी करावी, असे म्हटले आहे.
शिवसेना आमदार मेेहेंद्र दळवी यांचा व्हीडिओ माजी विरोधीपक्ष नेते ठाकरे शिवसेनेचे आ आंबादास दानवे यांनी व्हायरल केल्यावर, हा व्हीडिओ खासदार सुनील तटकरे यांनी दिला असा आरोप आमदार दळवी यांनी केला होता. त्यावरुन राजकाण तापलेले असतानाच आता चित्रलेख पाटील यांनी मंत्री गोगावले यांचा व्हीडिओ दाखवल्याने राजकरण अधीकच तापले आहे.
मंत्री भरत गोगावले यांच्याबाबत केलेल्या कथित आरोपाचे पडसाद महाड, पोलादपूर व श्रीवर्धनमध्ये जोरदार उमटले. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांचा जाहीर निषेधही केला. पोलादपूर येथे निषेध नोंदविताना शिवसेना नेत चंद्रकांत कळंबे, निलेश अहिरे, सुरेश पवार, लक्ष्मण मोरे, नगराध्यक्ष स्नेहा मेहता, विजय शेलार, विक्रम भिलारे, विनायक दीक्षित, नागेश पवार राजेश डांगे, दत्ता मोरे, सुनील तळेकर, अनिल दळवी, प्रसाद मोरे प्रसाद पवार गणेश येरूणकर, गीता दळवी, उद्योगपती रामदास कळंबे यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाड तालुका शिवसेना आणि युवासेना तर्फे जाहीर निषेध नोंदविण्यात आला. या वेळी बोलताना विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसल्याने त्यांनी रडीचा डाव सुरू केला असल्याचा आरोप शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले यांनी व्यक्त केला. चित्रालेखा यांच्या फोटोला चपला मारत निषेध नोंदविण्यात आला.
आमदारांकडे इतकी रक्कम येतेच कशी?
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवर ते गुन्हे आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जुनी आहे. इतकेच नव्हेतर मागे मी शिंदेसेनेच्या कुणाचेही नाव न घेता, पन्नास खोके, सर्व एकदम ओके, असे बोलले असता आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी माझ्या अंगावर मला मारण्या करिता धावून आल्या होत्या. याची देखील नोंद रायगड पोलिसांकडे आहे. अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आमदार दळवी यांची चौकशी शासनाच्या सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरो या तपास यंत्रणांनी सर्वप्रथम करणे आवश्यक असून त्यांतून वास्तव आमजनते समोर आलेच पाहिजे, अशी आमची मागणी आहे असे त्यांनी सांगतले.
अलिबाग, रोहा तसेच मुरुड तालुक्यातील अनेक विकासकामे अपूर्ण आहेत. कंत्राटदार आमदाराच्या कमिशनमुळे दबले असल्याचे दबक्या आवाजात बोलत आहेत. निधी नाही म्हणून कामे रखडली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते, मग आमदारांकडे इतकी रक्कम येतेच कशी? आणि म्हणूनच हा व्हिडिओ खरा आहे, की खोटा याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. आमदार दळवींपेक्षा मंत्री गोगावले यांच्यावर दाखल गुन्हे कमी आहेत, परंतू त्यांची देखील चौकशी होणे अपेक्षीत असल्याचे त्या म्हणाल्या.
शेकाप सतत पाठपुरावा करणार
सत्ताधाऱ्यांकडील या भ्रष्ट पैशाचा वापर निवडणूकांमध्ये होतो, हे थांबले पाहिजे, अशी आमची भूमिका असून त्याकरिताच ऐन हिवाळी अधिवेशनाच्या काळात समोर आलेल्या या नोटबंडल व्हीडिओचा तातडीने तपास झालाच पाहिजे. शेतकरी कामगार पक्ष त्यांकरिता सतत पाठपुरावा करणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी अखेरीस सांगीतले.
माझ्या निषेधाने भ्रष्टाचार लपणार नाही ः चित्रलेखा पाटील
माझ्या फोटोला चप्पल मारुन आणि माझा निषेध करुन शिंदे गटाचे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि मंत्री भरत गोगावले यांचा भ्रष्टाचार लपणार नाही. त्यांच्या व्हायरल झालेल्या नोटांच्या बंडलांच्या व्हिडिओची केंद्र आणि राज्य शासनाने सीबीआय, ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून सखोल चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाची आहे. अशी भूमिका शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दैनिक पुढारीशी बोलताना स्पष्ट केली आहे. मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या नोटांच्या व्हिडिओची सीबीआय, ईडी चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली आहे.
आम्ही मर्द आहोत, चुकीचे व्हिडीओ टाकणार नाही. त्यांनी टाकले म्हणून आम्ही असे चुकीचे व्हिडीओ टाकणार नाही. आम्ही मर्द आहोत. मर्दांची औलाद असे काही करत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही शिवसैनिक असून, एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहोत.भरत गोगावले, मंत्री, रोहयो