Political News Pudhari
रायगड

Bharat gogawale: ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपदाची प्रतीक्षा!; गोगावले यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान मिळाल्यानंतर गोगावले यांनी पालकमंत्रीपदाच्या निर्णयाबाबत सूचक विधान केले

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रायगडच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेला नसतानाच रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्याने या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त रायगड जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान मिळाल्यानंतर गोगावले यांनी पालकमंत्रीपदाच्या निर्णयाबाबत सूचक विधान केले. “आता कोणताही अडथळा नाही. निर्णय लवकरच होईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही काळापासून रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी गोगावले यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, महायुतीतील राजकीय समीकरणांमुळे अंतिम निर्णय लांबणीवर पडला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांचे नावही या पदासाठी चर्चेत असल्याने महायुतीच्या गोटात उत्सुकता कायम होती.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात गोगावले यांना ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पालकमंत्रीपदाबाबत त्यांनी व्यक्त केलेला विश्वास राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या स्तरावर होणार आहे. त्यामुळे आता वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाकडे रायगडचे लक्ष लागले आहे. गोगावले यांच्या वक्तव्यामुळे निर्णयाची वेळ जवळ आल्याचे संकेत मिळत असले तरी अधिकृत घोषणा होईपर्यंत पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT