उरण : देशात प्रतिबंधित फटाक्यांची तस्करी करणाऱ्या एका हाय-प्रोफाइल सिंडिकेटचा महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अधिकाऱ्यांनी एका 40 फुटी कंटेनरमधून 46,640 हून अधिक फटाके आणि शोभेची दारू जप्त केली आहे. या फटाक्यांची बाजारपेठेतील किंमत 4.82 कोटी रूपये इतकी आहे.
गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी न्हावा शेवा पोर्टवर एक 40 फुटी कंटेनर अडवला. तपासणीत, या कंटेनरमध्ये ’लेगिंग्ज’ (कपडे) असल्याचे घोषित करण्यात आले होते. हा माल चीनमधून आला होता आणि तो गुजरातच्या अंकलेश्वर येथील इनलँड कंटेनर डेपो साठी रवाना होणार होता. अधिकाऱ्यांनी कंटेनरची कसून तपासणी केली असता, कपड्यांच्या वरवरच्या थरामागे मोठ्या प्रमाणात 46,640 प्रतिबंधित फटाके लपवलेले आढळले. डीआरआय ने संपूर्ण माल तत्काळ जप्त केला.
या तस्करीच्या सिंडिकेटच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणारी महत्त्वाची कागदपत्रे पुढील शोधमोहिमेत जप्त करण्यात आली. या जलद कारवाईनंतर, या प्रकरणाशी संबंधित एका प्रमुख संशयिताला गुजरातच्या वेरावळ येथून अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, भारताच्या परराष्ट्र व्यापार धोरणांतर्गत फटाक्यांच्या आयातीवर निर्बंध आहेत. फटाके आयात करण्यासाठी डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड आणि पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन यांच्याकडून एक्सप्लोसिव्ह रुल्स, 2008 नुसार पूर्वपरवानगी आणि वैध परवाना असणे अनिवार्य आहे.
अवैध मार्गाने आयात केलेले हे फटाके केवळ व्यापार आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत नाहीत, तर ते स्फोट, आग आणि पर्यावरणाचे प्रदूषण यांसारखे गंभीर धोकेही निर्माण करतात. अधिकाऱ्यांनी चेतावणी दिली आहे की, अशा बेकायदेशीर मालामुळे बंदरातील कामगार, शिपिंग पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स धोक्यात येतात.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, या कारवाईमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षितता जपण्याच्या आमच्या बांधिलकीची पुन्हा एकदा पुष्टी झाली आहे. फटाक्यांसारख्या स्फोटक साहित्याच्या तस्करीला कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. दिवाळी जवळ येत असताना, हा मोठा साठा जप्त झाल्यामुळे बनावट कागदपत्रे आणि लपवलेल्या शिपमेंटद्वारे देशात प्रवेश करणाऱ्या चायनीज फटाक्यांच्या अवैध व्यापाराविरुद्ध अंमलबजावणी संस्थांची दक्षता वाढल्याचे दिसून येते.