पनवेल : २०१६ साली देशभरात खळबळ उडवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या हत्येचा भयानक थरार अखेर ९ वर्षांनी उजेडात आला. आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला पनवेल सत्र न्यायालयाने आज (दि.२१) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. परंतु, या खटल्यातील तपशील ऐकून अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. ही हत्या नव्हे, तर एक थंड डोक्याने आखलेली, क्रूर आणि विकृत प्रवृत्तीची रक्तरंजित कहाणी होती. (Ashwini Bidre Murder Case)
संबंधांच्या गुंत्यात अडकलेले अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे, दोघंही विवाहित. पण त्यांचा संबंध पुढे गेला. अगदी काळोख्या टप्प्यापर्यंत. अश्विनीने तिच्या पतीपासून नातं तोडलं. कुरुंदकरच्या वचनावर विश्वास ठेवला. घटस्फोट घेतो आणि तुझ्याशी लग्न करतो. पण नंतर कुरुंदकर मागे हटला. आणि मग रोजचे भांडण, तगादा, धमक्या. अखेर कुरुंदकरच्या मनात एकच विचार घोळू लागला. हिचा कायमचा अंत करावा.
एप्रिल २०१६. एक थरारक रात्री. कुरुंदकरने अश्विनीला घरी बोलावलं आणि तिच्या डोक्यावर बॅट ने प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेली अश्विनी मृत झाल्याची खात्री होताच कुरुंदकरने थेट बाजारातून वूड कटर मागवला. आणि दोन्ही हात वेगळे केले. दोन्ही पाय छाटले. मानेपासून शीर वेगळे केले. शेवटी धड आणि सहा तुकडे फ्रीजमध्ये ठेवले.
हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याची कुरुंदकरची योजना आखीव-रेखीव होती. त्याने मित्राच्या मदतीने गोण्या आणल्या. मृतदेहाचे तुकडे भरले. प्रत्येक भागासोबत २५ किलो वजन टाकले आणि वसई खाडीत फेकून दिले. आजपर्यंत तिचा मृतदेह सापडलेला नाही. क्रौर्याचा इतका विकृत नमुना, पोलीस खात्यातील एक अधिकाऱ्यांनेच करावा, ही शरमेची बाब आहे.
अश्विनी यांच्या मोबाईलवरून हाऊ आर यू हा प्रश्न विचारताना कुरूंदकरने 'यू' लिहिताना 'वाय', (y) हे अक्षर वापरले. मात्र अश्विनी कसीही यू लिहिताना y वापरत नसत त्या नेहमी U वापरत. हाच धागा पकडून गुन्हे शाखेने कुरूंदकरच्या मुसक्या आवळल्या होत्या. अभय कुरूंदकरचे नातेवाईक, मित्रांकडूनही पोलिसांनी या गोष्टींची खातरजमा करून घेतली होती.
दरम्यान, केलेल्या तपासामध्ये मित्रांशी चॅटिंग करताना कुरूंदकर 'यू' लिहिताना नेहमी 'Y' वापरत असल्याचेही पोलिसांना आढळून आले आहे. तसेच अश्विनी यांच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली असता अश्विनी 'यू' लिहिताना कधीही 'Y' वापरत नसे, असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे समोर आले आहे. अश्विनी यांची हत्या केल्यानंतर त्या जिवंत आहेत, असे भासवण्यासाठी कुरूंदकरने अश्विनी यांच्या मोबाईलवरून मेहुणे अविनाश गंगापुरे यांना व्हॉट्सअॅप मॅसेज केला होता. मानसिक अस्वास्थामुळे आपण उपचार घेण्यासाठी ५ ते ६ महिने उत्तरांचल किंवा हिमाचलला जाणार आहोत, असे या मॅसेजमध्ये महटले होते.
अभय कुरूंदवकारनेच एप्रिल २०१६ मध्ये अश्विनीच्या डोक्यात बॅट घालून तिची हत्या केली, अशी कबुली कुरूंदकरचा बालपणीचा मित्र व या प्रकरणातील सहआरोपी महेश पळणीकर याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, ९ वर्षांच्या तपासानंतर अश्विनी बेंद्रे यांच्या हत्याकांडातील आरोप सिद्ध झालेल्या मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याच्या शिक्षेची घोषणा २१ एप्रिल रोजी झाली.