182 आर्टिफीशियन रिफ अर्थात कृत्रिम भित्तिका उभारणीचे काम बुधवारी पूर्ण झाले.  Pudhari
रायगड

Artificial Reefs | समुद्रातील मत्स्य संवर्धनासाठी 182 कृत्रिम भित्तिका तयार

कोकणातील मत्स्य प्रजोत्पादन प्रक्रिया होणार गतिमान

पुढारी वृत्तसेवा
रायगड ः जयंत धुळप

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या पाच जिल्ह्यांच्या समुद्रात 15 फूट खोल समुद्रात मत्स्य प्रजोत्पादन प्रक्रीया गतिमान करण्याकरिता एकूण 182 आर्टिफीशियन रिफ अर्थात कृत्रिम भित्तिका उभारणीचे काम बुधवारी पूर्ण झाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अमलात आणण्यात आलेल्या या उपाययोजनेमुळे येत्या काळात कोकणातील मत्स्य दुष्काळावर मात करणे शक्य होईल असा विश्वास रायगडचे मत्स्य विभागाचे सहाय्यक आयूक्त संजय पाटील यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केला आहे.

  • समुद्राच्या तळाशी शास्त्रोक्त पद्धतीने या कृत्रिम भित्तिकांची उभारणीचे करण्यात आली आहे. या अंतर्गत समुद्राच्या तळाशी 15 ते 20 मीटर खोलीवर 2 हजार चौरस मीटरच्या भित्तिका उभारण्यात आल्या आहेत.

  • विशिष्ट रचनेत उभ्या-आडव्या संरचनेत या भित्तिका पसरवल्या आहेत. यामुळे समुद्राच्या तळाची मत्स्य संवर्धनासाठी कृत्रिम अधिवास तयार होण्यास मदत होणार आहे.

गेल्या काही वर्षांत समुद्रातील माशांची संख्या लक्षणीयरीत्या घटू लागल्याची तक्रार मच्छिमार बांधवांकडून करण्यात येत होती. त्यामुळे समुद्रातील ‘ओला दुष्काळा’साठी 182 कृत्रिम भित्तिका तयार करण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात 45 ठिकाणी, रत्नागिरी जिल्ह्यात 36 ठिकाणी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 40 ठिकाणी, ठाणे जिल्ह्यात 31 ठिकाणी तर पालघर जिल्ह्यात 30 ठिकाणी कृत्रिम भित्तिका उभारण्यात आल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर शासनाने फिश रेड लिस्ट जाहीर केली. त्यामध्ये मुशी, करवत, कानमुशी किंवा कनार, गोलाड किंवा वाकटी, कोंबडा, सोनमुसा, वागबीर, लांज किंवा लाजा, मिगला किंवा वाघोल, शिंग पाकट, वागली, सुंभा किंवा टोळ, घोडा मासा, गोब्रा इत्यादी माशांचा समावेश आहे. त्याचे कारण मांसाहारी माशांची संख्या घटत असून, तारली, बांगडा अशा शाकाहारी माशांची संख्या वाढली आहे. त्याच बरोबर मत्स्य प्रजोत्पादन ठिकाणांचा र्‍हास होत असल्याचे निरिक्षणातून समोर आले होते.

सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने घातक परिस्थिती मानली जात होती. त्यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास काही माशांच्या जाती लुप्त होण्याची भिती व्यक्त करण्यात आली होती. समुद्रातील अन्न साखळी बिघडत चालली होती. मासेमारीसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढत गेला. व्मासेमारीसाठी ट्रॉलर्सची संख्या वाढली, मोठी पर्ससीनसारखी जाळी आली. माशांना शोधणार्‍या सॅटेलाइटवर आधारित यंत्रणांचा वापर सुरू झाला. त्यामुळे माशांची संख्या तर घटलीच; परंतु अनेक प्रजाती नष्ट होऊ शकतात. दहा वर्षांत माशांच्या अनेक जाती समुद्रातून नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने दरवर्षी पावसाळ्यात माशांच्या विणीच्या हंगामात मासेमारीवर बंदी घालण्याचे आदेश देण्यास सुरुवात केली असली तरी त्याची कोटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. त्यामुळे आता सुमारे 65 मत्स्यप्रजातींपैकी 35 जाती संकटात सापडल्याची तक्रार होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन, मत्स्य संवर्धनासाठी कोकण किनारपट्टीवर समुद्रात 182 ठिकाणी कृत्रिम भित्तिकांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोकणच्या समुद्र किनारपट्टीतील 65 प्रमुख मत्स्यप्रजातींपैकी 35 मत्स्यजाती संकटात सापडल्याने सागरी मत्स्योत्पादनावर विपरित परिणाम झाल्याचे काही वर्षांपूर्वी लक्षात आले. खोलसमुद्रातील माशांच्या माद्यांना अंडी घालण्याकरिता तसेच नवजात पिल्लांना स्थिरावण्याकरिता आवश्यक असणारी नैसर्गिक मत्स प्रजोत्पादनाची ठिकाणे कमी वा नामशेष झाल्याने मत्यदुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली.

अशी असते कृत्रिम भित्तिका

पाण्याची खोली, जलप्रदूषण, पाण्याची पारदर्शकता, लाटांचे प्रमाण या गोष्टींचा अभ्यास करून ही ठिकाणे निवडण्यात आली आहेत. या कृत्रिम भित्तिका प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीवर मत्स्यप्रजातींचे संवर्धन आणि उत्पादन वाढीस गती मिळणार आहे. कृत्रिम भित्तिका या सिमेंट, लोखंड ,दीर्घकाळ टिकणार्‍या वस्तूंचा वापर करून पोकळ स्वरूपाच्या रचनांची निर्मिती करुन नंतर त्यांची समुद्राच्या तळाची मांडणी केली जाते. माशांना सुरक्षित वातावरण तयार झाल्याने ते या कृत्रिम भित्तिकांच्या ठिकाणी अधिवास करण्यास सुरुवात करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT