

खारेपाटात क्षेत्रात पावसाच्या पाण्यावरच भातशेती होत असते. पावसाळ्यानंतर पाण्याचे मोठे दुर्भीक्ष या क्षेत्रात असल्याने येथे दुबार भातशेती इच्छा असूनही शेतकर्यांना करता येत नाही. परंतू पेण तालुक्यातील खारापाट विभागातील बहिरामकोटक गावांतील तरुण प्रयोगशील शेतकरी दयानंद म्हात्रे यांनी आपल्या शेतातील तलावाच्या पाण्यावर दुबार भात शेतीचा प्रयोग यशस्वी केला असून, रायगडच नव्हे तर संपूर्ण कोकणातील खारेपाटातील शेतकर्यांपूढे एक आदर्श वस्तूपाठ ठेवला आहे.
भात हे उष्ण कटीबंधातील पीक असून त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते. पीक वाढीच्या कालावधीतील सरासरी तपमान 24 ते 32 अंश से. ग्रे. पोषक असते. चांगले उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आद्रता 65 टक्के लागते. या पिकास सरासरी 1000 मि.मी. पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते. पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. परंतु पाणी उपलब्ध नाही अशा क्षेत्रात तलावाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करुन घेऊन पेण तालुक्यातील बहीरामकोटक येथील दयानंद म्हात्रे या तरुण प्रयोगशील शेतकर्यांने उन्हाळी भात शेती प्रथमच यशस्वी करुन येथील शेतकर्यांना बेरोजगारीवर मात कशी करायची हे दाखवून दिले आहे. दयानंद यांनी यावर्षी प्रथमच दुबार भातशेती केली आहे.
खरिप अर्थात पावसाळी शेतीपेक्षा उन्हाळी शेती बर्यापैकी सोपी आहे आणि चांगले पिक देणारी असल्याचे दयानंद यांनी म्हटले आहे. बेभरवशाच्या पावसावर शेती करणे आत्ताच्या काळात खूप कठीण आहे.कारण निसर्गाच्या अनियमित बदला मुळे, जून जुलै महिन्यात पाऊस पडला तर खुप, नाहीतर शेतातील पिके करपून जातात तर कधी पावसाचा पत्ता नसतो, त्यामुळे उन्हाळी शेती फायद्याची ठरते.
खारेपाटातील जमीन चिकट असून पाणी शेतात टिकून राहते. याचा फायदा घेत उन्हाळी शेती करण्याचे ठरवून ती योग्य रित्या पिकवून चांगल्या प्रकारे रोप तयार झाली असल्याचे त्यांनी सांगीतले.
पेण खारेपाट भागात शेतीसाठी पाणी नसल्यामुळे येथील बळीराजा मागे राहिला आहे. शासनाकडुन सिंचनासाठी पाणी देवु आणि खारेपाटाचा परिसर सुजलाम सुफलाम करु अशा केवळ पोकळ घोषणा करण्यात आल्या. परंतु आज पर्यंत पिण्याच्या पाण्याची आणी शेती सिंचनाची सोय कधीच झाली नाही. येथील शेतकर्यांच्या सातबारा मात्र कित्येक वर्ष हेटवणे सिंचन क्षेत्राखालील जमीन हा शिक्का मात्र कायम आहे.
गेल्या वर्षी पावसाळी शेती झाल्यानंतर शेतात पडलेले भाताचे दाणे पुन्हा रोप बनुन वर आले. मी त्या रोपांना दररोज पाणी घालायचो. ती रोप मार्चपर्यंत चांगल्या प्रकारे तयार झाली आणि त्या रोपातुन मला 10 किलो भात मिळाले. त्या दिवसापासून मी ठरवले की आपण उन्हाळी शेती करायची आणि ती मी करण्याचा प्रयत्न केला आणी त्यात मी यशस्वी होत आहे.
- दयानंद पाटील, प्रयोगशील तरुण शेतकरी, बहीरामकोटक,पेण