अलिबाग : रायगड जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांसाठी रविवारी मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, 288 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी 83 टेबल लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 34 तर 207 नगरसेवक पदांसाठी 575 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमावत आहेत. मतमोजणी केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, पेण, रोहा, श्रीवर्धन, महाड, कर्जत, खोपोली, माथेरान आणि उरण या दहा नगरपरिषदांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यांनतर सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रूम) तयार करून या कक्षात मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे ठेवण्यात आली आहेत. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शनिवारी सकाळी या सुरक्षा कक्षाचे सील निवडणूक निर्णय अधिकारी तसेच इतर अधिकारी व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहेत.
रविवारी मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्यूलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रीयेदरम्यान वैध ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
मतमोजणीसाठी महाडचे प्रशासन सज्ज
महाड : महाड नगर परिषदेच्या दोन डिसेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या रविवार 21 डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवनात करण्यात येणार असून या ठिकाणी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश शितोळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. महाड नगर परिषदेमध्ये एकूण दहा प्रभाग असून या मधून 20 नगरसेवकांना तसेच नगराध्यक्षांना थेट पद्धतीने निवडून द्यावयाचे आहे .
निवडणूक निर्णय अधिकारी महेश शितोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 10 टेबलची रचना करण्यात आली असून या ठिकाणी 10 पर्यवेक्षक ,10 सुपरवायझर यांसह अन्य 25 कर्मचारी व पोलीस यांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करताना मतमोजणी प्रभाग निहाय होणार असून त्याची घोषणा केली जाईल असे सांगितले. मतमोजणी संदर्भात कमालीची उत्सुकता दिसून येत असून निवडणुक मतदानाच्या दिवशी झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.