पनवेल : मुंबईतील अंधेरी भागात राहणाऱ्या एका व्यावसायिकाने त्याच्या बालपणीच्या सहा मित्रांची जमीन व्यवहारात फसवणूक करून तब्बल 10 कोटी 40 लाख रुपये लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविशंकर कृष्णरायाज पसुपुलेटी असे त्याचे नाव असून, पनवेल शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
तक्रारदार ए. रामकृष्णा (57) हे आंध्र प्रदेश येथे राहत असून, 2013 मध्ये ते व त्यांचे इतर सहा मित्र मुंबईत आले होते. त्या वेळी मुंबईत राहणारा त्यांचा बालपणीचा मित्र रविशंकर याने पनवेल तालुक्यातील तुरमाळे गावातील जमीन भविष्यात खूप महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगून ही जमीन खरेदी करण्यास मित्रांना सुचवले होते. त्यानुसार रामकृष्णा व त्यांच्या मित्रांनी मिळून तुरमाळे गावातील 18 गुंठे जमीन रविशंकर पसुपुलेटी याच्या माध्यमातून खरेदी करण्याचे ठरवले व जमीन खरेदीसाठी सर्वांनी मिळून 85 लाख रुपये रविशंकर याला दिले होते.
त्यानुसार 2019 मध्ये या जमिनीचे खरेदीखत रामकृष्णा यांच्या नावावर करण्यात आले. या जमिनीचा व्यवहार देवाशिष चक्रवर्ती व आशिष गाडगीळ यांच्या नावे नोंद असून, रविशंकर याने या व्यवहाराबाबत रामकृष्णा व त्यांच्या मित्रांना कोणतीही माहिती न देता ही जमीन विक्री व्यवहार करून 10 कोटी 30 लाख रुपयांचा व्यवहार करून मूळ भागीदारांना त्यांचा हिस्सा न देता सर्व रक्कम हडपल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर रामकृष्णा व त्याच्या मित्रांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी रविशंकरविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दोन वर्षापूर्वीच जमिनीचा व्यवहार
त्यानंतर रविशंकरने सातबारा नोंदणी लवकरच करून देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यानंतर तो टाळाटाळ करू लागला. वारंवार पाठपुरावा करूनही रविशंकर याने सातबारा त्यांच्या नावावर नोंदणी करून न दिल्याने रामकृष्णा व त्यांच्या मित्रांनी कायदेशीर सर्च रिपोर्ट काढला असता, त्यात्त रविशंकर याने 18 जानेवारी 2024 रोजी ही जमीन में क्रेस्ट रिसॉर्ट अँड स्पा प्रा. लि. यांना तब्बल 10 कोटी 30 लाख रुपयांना परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आले.