Ambenali Ghat accident Pudhari
रायगड

Ambenali Ghat accident: भय इथले संपत नाही, ‌‘आंबेनळी‌’ प्रवासासाठी धोकादायकच!

तुटलेले संरक्षक कठडे; रेलिंगअभावी अपघातांचा अधिक धोका; मार्ग वाहतुकीस सुरक्षित करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

समीर बुटाला

पोलादपूर: महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यानच्या आंबेनळी घाटात 2018 मध्ये झालेल्या बस अपघातात 30 जणांचा मृत्यू झाला होता. तर सोमवारी स्कार्पियो गाडी दरीत कोसळून आठ तरुणांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे घाटातील प्रवास हा अद्यापही धोकादायकच ठरत आहे. तुटलेले संरक्षक कठडे व रोलिंग हे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे. शासनाने हा मार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याची मागणी होत आहे.

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात घडलेल्या भीषण दुर्घटनेत आठ युवकांना आपला जीव गमवावा लागल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने नेमकी कोणती दखल घेतली? घाटातील सुरक्षेच्या त्रुटी दूर करण्यासाठी कोणती उपाययोजना केली, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा तसेच महाबळेश्वरला येणाऱ्या लाखो पर्यटकांचा मुख्य मार्ग असलेला आंबेनळी घाट आजही अनेक गंभीर सुरक्षाविषयक समस्यांनी ग्रासलेला असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान सुमारे 45 किलोमीटर लांबीचा हा घाट नागमोडी वळणे, तीव्र उतार, अरुंद रस्ते खोल दऱ्यांसाठी ओळखला जातो. महाबळेश्वरहून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला याच घाटातून प्रवास करावा लागतो. निसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला हा घाट अनेकदा अपघातांचे केंद्र ठरत आहे.

नागरिकांच्या मते, अलीकडील दुर्घटना पोलादपूर हद्दीत घडली असली तरी सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील घाटमार्गाची स्थितीही अत्यंत चिंताजनक आहे. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना सातारा जिल्ह्याच्या हद्दीत घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः महाबळेश्वर ते प्रतापगड दरम्यानच्या घाटरस्त्यावर अनेक ठिकाणी संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत असून काही ठिकाणी त्यांची दुरुस्तीही झालेली नाही.

काही वर्षांपूर्वी तुटलेल्या सिमेंटच्या कठड्यांच्या जागी प्रशासनाने पत्र्याचे कठडे बसवून तात्पुरती उपाययोजना केली होती. मात्र आज त्या पत्र्याच्या कठड्यांचीही दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी ते वाकलेले किंवा तुटलेले दिसून येतात.

खोल दरीच्या कडेला असलेल्या या धोकादायक ठिकाणी प्रभावी आणि मजबूत संरक्षण व्यवस्था उभारण्याऐवजी तात्पुरत्या उपायांवर भर दिला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पर्यटक आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाची ही भूमिका गंभीर प्रश्न निर्माण करणारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT