Accident Pudhari
रायगड

Ambenali Ghat Accident | पहाटेची वेळ अन् काळजाचा ठोका चुकला! महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर भीषण अपघात; कार 400 फूट खोल दरीत कोसळली

Ambenali Ghat Accident | रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाट परिसरात गुरुवारी पहाटे भीषण अपघात घडला.

पुढारी वृत्तसेवा

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाट परिसरात गुरुवारी पहाटे भीषण अपघात घडला. पोलादपूर–महाबळेश्वर–वाई–सुरूर राज्य मार्गावरील बावली टोकाजवळ मारुती वॅग्नर कार सुमारे 300 ते 400 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ही घटना 12 मार्च 2026 रोजी पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील लाखवड गावातील काही ग्रामस्थ मुंबईहून आपल्या गावी परतत होते. पहाटेच्या वेळी आंबेनळी घाटातील बावली टोक–चिरेखिंड दरम्यान वाहनाचा ताबा सुटल्याने वॅग्नर कार रस्त्याच्या कडेला जाऊन खोल दरीत कोसळली.

घाटातील हा भाग अत्यंत धोकादायक मानला जातो. वाहनाचा वेग आणि तीव्र वळण यामुळे कार थेट दरीत कोसळली. अपघातानंतर कार सुमारे 300 ते 400 फूट खोल दरीत जाऊन अडकली. पहाटेच्या शांत वातावरणात झालेल्या या अपघातामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

या अपघातात अजय सुनील संकपाळ, तुकाराम संकपाळ, सुनील संकपाळ, पार्थ संकपाळ आणि संगीता संकपाळ हे प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. सर्व जखमींना तातडीने बाहेर काढून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य तसेच महाबळेश्वर ट्रेकर्स घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने प्रथम आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभी केली. त्यानंतर दोरीच्या साहाय्याने सदस्य दरीत उतरले आणि सर्वात गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला स्ट्रेचरच्या मदतीने वर आणले.

यानंतर उर्वरित जखमींनाही सुरक्षितपणे वर काढण्यात आले. या मोहिमेत प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अजित जाधव, अनिकेत वागदरे, संकेत सावंत, ऋषिकेश जाधव, आशिष बिरामने यांच्यासह महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील बाबा भाटिया, अमित कोळी, सुजित कोळी आणि सोमनाथ वागदरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बचावकार्यात वाडा कुंभरोशी आणि चिरेखिंड येथील ग्रामस्थांनीही मदत केली. तसेच पोलादपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. अत्यंत धोकादायक परिस्थितीत उतरून जखमींना बाहेर काढणाऱ्या स्वयंसेवकांच्या धाडसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT