Alphonso Mango Price File Photo
रायगड

alibaug alphonso mango: अलिबागमध्ये हापूलचे उत्पादन केवळ 25 टक्क्यांवर; खर्चदेखील परत मिळणे कठीण, निसर्गासमोर बागायतदार हतबल

alibaug alphonso mango: उत्पादनात लक्षणीय घट

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: कोकणातील प्रसिद्ध हापूस आंबा यंदा अवकाळी पाऊस, प्रतिकूल हवामान आणि अपुरी फळधारणा यामुळे मोठ्या संकटात सापडला असून उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. अलिबाग तालुक्यात यंदा केवळ सुमारे 25 टक्केच उत्पादन हाती येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यंदाचा आंबा हंगाम अत्यंत मर्यादित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईलगत असलेला अलिबाग तालुका हा दर्जेदार हापूस आंबा उत्पादनासाठी ओळखला जातो. तालुक्यात एकूण सुमारे 16 हजार 229 हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून त्यापैकी 12 हजार 986 हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन घेणाऱ्या या भागाला यंदा मात्र नैसर्गिक अडचणींना सामोरे जावे लागले.

हंगामाच्या सुरुवातीला आंब्याच्या बागांमध्ये मोहोर चांगला आला होता. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून झाडांवर मोहोर दिसू लागला, तर जानेवारी महिन्यात बागा मोठ्या प्रमाणात मोहरल्या होत्या.

मात्र, या मोहरात संयुक्त (फलधारणा करणाऱ्या) फुलांचे प्रमाण कमी आणि नर फुलांचे प्रमाण अधिक असल्याने प्रत्यक्ष फळधारणा कमी झाली. यासोबतच नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून जानेवारी अखेरपर्यंत तापमानात घट झाल्याने परागीभवन प्रक्रियेवरही विपरीत परिणाम झाला. परिणामी फुलांपासून फळ तयार होण्याचे प्रमाण घटले. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे उत्पादनात मोठी घसरण झाली आहे.

कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनीही अलिबाग परिसरातील आंबा बागांची पाहणी करून विविध कारणांमुळे यंदा उत्पादन कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार आणि अपुरी फळधारणा ही मुख्य कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बागायतदारांसमोर आर्थिक आव्हान

उत्पादन घटल्यामुळे आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बागांची देखभाल, फवारणी, खत व्यवस्थापन यासाठी केलेला खर्चदेखील परत मिळणे कठीण झाले असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यातच आंतरराष्ट्रीय परिस्थिती, विशेषतः आखाती देशांतील तणावामुळे आंबा निर्यातीवरही परिणाम झाला आहे. एकूणच, यंदाचा हापूस हंगाम उत्पादन घट, वाढलेला खर्च आणि निर्यात अडचणी या तिहेरी संकटात अडकला असून बागायतदारांसमोर आर्थिक आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT