Municipal Ground Encroachment Pudhari
रायगड

Municipal Ground Encroachment: राजकीय आश्रयामुळे पालिकेच्या मैदानावर माफिया राज! स्पोर्ट्स क्लबचा कब्जा

प्रशिक्षणाच्या नावाखाली सर्रास लूट

पुढारी वृत्तसेवा

सचिन जाधव

खारघर: शहरातील पालिकेच्या सार्वजनिक मैदानावर काही स्पोर्ट्स क्लबने उघडपणे कब्जा करून ‌‘प्रशिक्षण‌’या नावाखाली नागरिकांची लूट सुरू केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणामागे काही राजकीय कार्यकर्त्यांचा उघड आशीर्वाद असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

सिडकोने खारघर वसाहत निर्माण केल्यांनतर सेक्टर निहाय उद्यान आणि खेळाचे मैदान उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, लहान मुले आणि युवक मुक्तपणे खेळत होते,मात्र खारघर शहराच्या वाढत्या विकासामुळे भर पडत असल्यामुळे हळूहळू खेळाचे धडे देणाऱ्या प्रशिक्षकाने राजकीय व्यक्तीच्या मदतीने खासगी क्लब सुरु केल्यामुळे बहुतांश मैदान हे क्लबच्या ताब्यात गेले आहे.

काही क्लब कडून क्रिकेट ,फुटबॉल,हॅण्डबॉल,स्केटिंग आदी विविध खेळाचे धडे देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारून प्रशिक्षण दिले जात आहे. कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय पालिकेच्या मालमत्तेचा सर्रास व्यवसायासाठी वापर केला जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हे मैदान आता सार्वजनिक राहिलेच नाही, तर काहींच्या खाजगी कमाईचे साधन बनले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाने डोळेझाक केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. या प्रकरणात पालिकेने तातडीने चौकशी करून संबंधित स्पोर्ट्स क्लबवर कडक कारवाई करावी, मैदान त्वरित नागरिकांसाठी खुले करावे आणि राजकीय हस्तक्षेप थांबवावा, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.

खारघर शहरात क्रिकेटच्या नावाखाली काही स्थानिक राजकीय कार्यकर्ते उद्यान आणि खेळाच्या मैदानाचा अनधिकृत गैरवापर करीत आहेत. काही ठराविक अकॅडमीचे खेळाडू मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या विविध वयोगटात खेळाडू शाळा, कॉलेज आणि नवी मुंबई प्रीमियर लीग स्पर्धेत संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे.ही बाब पनवेल महानगरपालिका क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे असे मत प्रशिक्षक कृष्णा खडगी यांनी व्यक्त केले आहे.

आर्थिक लूट....

एका क्रिकेट प्रशिक्षका कडून मिळालेल्या माहिती नुसार एका खेळाडू कडून दरमहा दोन हजार रुपये शुल्क आकारले जाते. एका अकॅडमी मध्ये साधारण 40 ते 50 मुले सराव करतात, ज्यातून महिन्याकाठी 80 हजार रुपयांहून अधिक पैसे मिळतात. शनिवार आणि रविवारी या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी क्रिकेट सामन्यासाठी प्रती खेळाडू कडून तीनशे ते पाचशे रुपये शुल्क आकारले जाते.

त्यात क्रिकेटच्या सामन्यासाठी मैदान शुल्क म्हणून पाच हजार स्वीकारले जाते. हे मैदान पालिकेचे असताना महिना काठी प्रशिक्षण शुल्क क्रिकेट सामने असे मिळून जवळपास दोन लाख रुपये मिळतात. हे सर्व राजकीय व्यक्तीच्या आशीर्वादामुळे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

खारघर प्रभाग कार्यालयातील कर्मचारी पाठवून सर्व मैदानाची पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.
- प्रसंजित कार्लेकर, उपायुक्त, पनवेल महानगर पालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT