रायगड - ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी काशीद समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या एका पुणेकर कुटुंबावर आज सकाळी काळाने झडप घातली. पुणे येथील रहिवासी असलेले आकाश साबळे आणि सिद्धी साबळे हे आपल्या कुटुंबासह काशीद बीचवर आले होते. सकाळी ७.४० वाजताच्या सुमारास हे कुटुंब पोहण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने २० वर्षीय सिद्धी साबळे ही तरुणी अचानक समुद्राच्या खोल पाण्यात ओढली जाऊ लागली. ती बुडत असल्याचे लक्षात येताच, तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई प्रविण रोटकर (बकल नंबर १०२८) आणि पोलीस शिपाई जितेंद्र माने (बकल नंबर १५३१) यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ धाव घेतली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या पोलीस कर्मचाऱ्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून खरेदी केलेल्या 'रोबोटिक बोयो' या रिमोट ऑपरेटेड वॉटरक्राफ्टचा वापर केला आणि बुडणाऱ्या सिद्धीला ऐनवेळी सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांच्या या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला असून, या आधुनिक यंत्रणेची उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
नागाव बीचवर आधुनिक जीवरक्षक यंत्राचे यशस्वी प्रात्यक्षिक
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने उचललेल्या या महत्त्वाच्या पावलाची प्रचिती नागाव बीचवरही पाहायला मिळाली. पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तींना तात्काळ मदत व बचावकार्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असलेल्या याच “रोबोटिक बोयो” चे नागाव बीच येथे यशस्वी प्रात्यक्षिक पार पडले. या प्रात्यक्षिकाला कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी विशेष उपस्थिती लावून यंत्रणेची प्रत्यक्ष कार्यपद्धती जाणून घेतली. हा उपक्रम पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी “रोबोटिक बोयो खऱ्या अर्थाने जीवनरक्षक ठरत आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
या आधुनिक यंत्राच्या प्रात्यक्षिक प्रसंगी नागावच्या सरपंच सौ. हर्षदा मयेकर, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन राऊळ यांच्यासह जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी डॉ. रवींद्र शेळके, तहसिलदार विक्रम पाटील आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पर्यटन सुविधा सक्षम करण्याचे व पायाभूत सुविधा वाढविण्याचे निर्देश
नागाव बीचला भेट दिली असता विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केवळ सुरक्षेचाच नव्हे, तर एकूणच पर्यटन विकासाचा सविस्तर आढावा घेतला. बीचवर येणाऱ्या पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा अधिक सक्षम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. यामध्ये विशेषतः महिला व पुरुषांसाठी शौचालयांची संख्या तातडीने वाढविणे, तसेच बीचवर येणाऱ्या पर्यटकांची अचूक माहिती संकलित करण्यासाठी एक प्रभावी व गतिमान व्यवस्था उभारण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देशित केले.नागाव ग्रामपंचायतीच्या नाविन्यपूर्ण वाटचालीचे कौतुक
सरपंच सौ. हर्षदा मयेकर यांच्या नेतृत्वाखाली नागाव ग्रामपंचायत आणि त्यांची संपूर्ण टीम सातत्याने विविध अभिनव उपक्रम राबवत आहे. नागाव बीचची सुरक्षा, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि आधुनिक सुविधांचा समतोल साधत या परिसराला एक आदर्श पर्यटनस्थळ बनविण्याचे काम ग्रामपंचायतीने केले असून, विभागीय आयुक्तांनी या यशस्वी वाटचालीचे विशेष कौतुक केले.
सुरक्षित पर्यटनाचे नवे पर्व
“रोबोटिक बोयो” सारख्या अत्याधुनिक आणि रिमोट-कंट्रोल्ड तंत्रज्ञानाचा वापर हा रायगडच्या पर्यटन विकासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस कर्मचारी यांच्यात असलेल्या उत्तम समन्वयातून आणि या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भविष्यात ही किनारपट्टी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात सुरक्षित, स्वच्छ आणि आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. संकटसमयी देवदूत ठरलेल्या या यंत्रणेचे आणि प्रशासनाचे पर्यटकांकडून आभार मानले जात आहेत.