Crime News pudhari photo
रायगड

Alibaug Crime : अलिबागमधील लॉजिंगमध्ये कुंटणखाना; दोघांना अटक

एक आरोपी फरार; दोन महिलांची सुटका

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील चेंढरे-गोंधळपाडा परिसरातील ब्ल्यू मुनविला फोर्ट लँड हॉटेल लॉजमध्ये कुंटणखाना चालविल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला. या प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी शैलेश तांडेल हा फरार आहे.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, अलिबागचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन अशोक कुलकर्णी यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा भारतीय न्यायसंहितेच्या कलम १४३, ३(५) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ मधील कलम ३, ४ आणि ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या नोंदीनुसार, शैलेश प्रभाकर तांडेल (वय ५८, रा. चेंढरे, ता. अलिबाग), शलाका शैलेश तांडेल (वय ५०, रा. चेंढरे, ता. अलिबाग ) आणि कृष्णा जानू ठाकूर (वय ६०, रा. बापले, ता. अलिबाग) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी शलाका तांडेल आणि कृष्णा ठाकूर यांना ८ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता अटक करण्यात आली, तर शैलेश तांडेल याला अद्याप अटक झालेली नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, चेंढरे-गोंधळपाडा येथील एचपी पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या ब्ल्यू मुनविला फोर्ट लँड हॉटेल लॉजचा कुंटणखाना म्हणून वापर केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. आरोपींनी दोन महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून पुरुष ग्राहक उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. तसेच या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

कारवाईदरम्यान चेंबूर आणि ठाणे येथील एक ३५ वर्षीय आणि एक २६ वर्षीय महिलांची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे, शैलेश तांडेल आणि त्याची पत्नी शलाका तांडेल यांच्याविरुद्ध यापूर्वीही अलिबाग पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT