अलिबाग : होळी झाली की उन्ह तापायला सुरवात होते मात्र सध्या जिल्ह्यात दिवसा उन्हाचा चटका अन् रात्री अचानक वाढणारी थंडी यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. बदलते हवामान, तापमानातील सततच्या चढ-उतारामुळे त्रस्त नागरिकांच्या सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागत आहेत.
सध्या दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवत आहे. दिवसा कोरडी आणि उष्ण हवा, तर रात्री थंड व दमट वातावरण असते. त्याचा परिणाम येथील नागरिकांवर होत आहे. हवामानातील बदलामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन संसर्ग होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयांत उपचार घेत आहेत. या हवामान बदलाचा विशेष परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह दमा, ॲलजर्जी आजारांनी बाधित रुग्णांवर होत आहे. ओपीडीमध्ये घशात खवखव, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
बदलत राहणाऱ्या वातावरणाचा पूर्वीपासून आजार असलेले नागरिक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी यांना अधिक त्रास सहन करावा लागत असतो. त्यामुळे वयोगटातील नागरिकांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
घशात खवखव किंवा दुखणे, सर्दी, नाक वाहणे, कोराडा किंवा कफयुक्त खोकला, श्वास घेताना घरघर, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा अशी लक्षणे या आजाराची आहेत.
सर्दी-खोकला, ताप किंवा श्वसनाचा त्रास होत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, हातांची स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी फिरणे टाळावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच वेळेवर निदान झाल्यास आणि योग्य उपचार केल्यास आजारावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येईल, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे. कोमट पाणी पिणे, वाफ घेणे व मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे, हलका, पौष्टिक आहार घेणे.
सध्याच्या वातावरणात लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. सर्दी, खोकला किंवा श्वसनाचा त्रास दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, विशेषतः दमा व ॲलर्जीच्या रुग्णांनी नियमित औषधोपचार सुरू ठेवावेत.डॉ. निशिकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक