अलिबाग : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अलिबाग - वडखळ रस्त्यावरील खड्डे अखेर पुन्हा एकदा तात्पुरते भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हे खड्डे भरताना ठेकेदार अगदी निवडून खड्डे भरत असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत. हे खड्डे भरण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. परंतु किमान मोठे खड्डे बुजवल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.
अलिबाग- वडखळ महामार्गावर गेल्या वर्षभरापासून खड्डे पडले होते. या खड्ड्यातून रोज प्रवास करणा-या प्रवाशांना मनस्ताप होत होता. या रस्त्यासाठी राजकीय, सामाजिक संस्थानी आंदोलन केले होते. मात्र खड्डे भरण्यास सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरत होते. पावसाचे आगमन वाढल्यामुळे खड्डे भरण्यास अडचणी येत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला होता.
अखेर पुन्हा एकदा या महामार्गावर खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हे खड्डे भरण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. त्याचप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने हे खड्डे भरण्याचे काम सुरू केल्याची चर्चादेखील रंगली आहे.
सरसकट खड्डे न भरल्याने नाराजी
वडखळ-अलिबाग या महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सध्या ठेकेदाराकडून हे मोठे खड्डेच बुजवले जात आहेत. मात्र यामुळे रस्ता उंच - सखल झाल्याने वाहनचालकांची विशेषतः दुचाकीचालकांची मोठी तारांबळ उडत आहे. त्यामुळे नवीन रस्ता होईल तेव्हा होईल तोपर्यंत किमान सरसकट खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.
वाहतूककोंडीचा ताप
अलिबाग-वडखळ रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात झाली असली तरीदेखील, हे काम दिवसभरात रहदारीच्या वेळी होत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सध्या निवडणूक व हिवाळी पर्यटन हंगाम यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.