Alibag Roha Traffic Jam Pudhari
रायगड

Alibag Roha Traffic Jam: अलिबाग-रोहा रस्त्यावर भीषण वाहतूककोंडी; बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा धोक्यात

कुरुळ परिसरात रस्त्याच्या कामामुळे तासन्‌तास ट्रॅफिक; ‘युद्धपातळी’च्या दाव्यांवर नागरिकांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : अलिबाग-रोहा मार्गाच्या नूतनीकरण व रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात या कामामुळे नागरिकांचे हाल होत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचा संताप व्यक्त होत आहे. विशेषतः बारावीच्या परीक्षेच्या काळात वाहतूक नियोजनाचा पूर्णपणे अभाव असल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र गाठण्यासाठी अक्षरशः झुंज द्यावी लागली.

सहाणगोठी ते सहाण बायपास आणि आरसीएफ कॉलनी, कुरुळ गेट ते कुरुळ वळण या दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. सकाळी अकरा वाजता पेपर असताना अनेक विद्यार्थी रस्त्यात अडकून पडले. काहींना वाहन सोडून पायपीट करत परीक्षा केंद्र गाठावे लागले, तर काही जण उशिराने पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. कामाची गती आणि गुणवत्ता सांगणाऱ्यांनी आधी नियोजनाची गुणवत्ता दाखवावी, अशी मागणी केली जात आहे.

प्रशासनाने विशेष नियोजन करण्याची मागणी

दरम्यान, दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असताना तरी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन करावे, बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी आणि रस्ते कामाचे वेळापत्रक तात्पुरते बदलावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असताना नियोजनशून्य कामे करून प्रशासन आणि कंत्राटदार नेमका कोणाचा विकास करत आहेत, असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT