Road Construction Negligence pudhari photo
रायगड

Raigad News : कुरुळ रस्त्याच्या नियोजनशून्य कामाचा फटका

रुग्णवाहिका अडकल्याने दीड वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : अलिबाग-रोहा मार्गावरील बेलकडे ते कुरुळ दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या नियोजनशून्य कामामुळे झालेल्या भीषण वाहतूक कोंडीने एका निष्पाप बालकाचा सोमवारी बळी घेतला आहे. बामणगाव (खारीकपाडा) येथील अवघ्या एक वर्षे आठ महिन्यांच्या आरांश सुशील ठाकूर या चिमुरड्याची रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकल्याने उपचारास विलंब होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे अलिबाग तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, जबाबदार ठेकेदार व प्रशासनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केली आहे.

सोमवारी दुपारी घरात खेळत असताना आरांशने चुकून फुगा गिळला. श्वास घेण्यास त्रास होऊन त्याची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यासाठी धाव घेतली. मात्र, बेलकडे-कुरुळ मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका बराच वेळ अडकून पडली. अखेर दुपारी चारच्या सुमारास रुग्णवाहिका रुग्णालयात पोहोचली; परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी आरांशला मृत घोषित केले.

अलिबाग-रोहा मार्गावरील बेलकडे ते कुरुळ या अपूर्ण रस्त्याचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआयडीसी) हाती घेण्यात आले आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी दिवाळीनंतर प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या सूचना वाहतूक विभागाने संबंधित ठेकेदाराला दिल्या होत्या. मात्र, ठेकेदाराने पोलिसांच्या या आदेशाचे उल्लंघन करत ऐन सणासुदीच्या काळात काम सुरू केले.

कामादरम्यान पर्यायी रस्त्याची कोणतीही व्यवस्था न केल्याने गेल्या चार दिवसांपासून या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका नोकरदार, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांना बसत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या वाहनांना जाण्यासाठी कोणताही मोकळा मार्ग ठेवण्यात आलेला नाही, तसेच वाहतूक नियंत्रणासाठी पुरेसे कर्मचारीही तैनात नाहीत.

शेकाप आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

या दुर्दैवी घटनेनंतर शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी प्रशासन आणि ठेकेदाराच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे एका निष्पाप बालकाचा जीव गेला आहे. या मृत्यूला प्रशासन आणि ठेकेदारच जबाबदार आहेत,असा आरोप घरत यांनी केला आहे. दरम्यान,संबंधित ठेकेदार आणि दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मृत आरांशच्या कुटुंबीयांना प्रशासन आणि ठेकेदाराकडून तातडीने आर्थिक मदत दिली जावी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या मार्गावर तत्काळ पर्यायी रस्त्याची आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT