अलिबागः अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी हे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार का, हा सध्या चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे. अलिबागमधील सत्तासमीकरणांवर त्यांचा निर्णय थेट परिणाम करणारा ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
आ. दळवींची भूमिका ठरल्यावरच शिंदे गट आणि भाजप युतीच्या स्थानिक प्रचाराच्या दिशा निश्चित होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अलिबागमधील मतदारसंघात त्यांचा प्रभाव लक्षणीय असून, त्यांच्या निर्णयामुळे शेकापच्या रणनीतीवरही परिणाम होऊ शकतो.
अलिबाग नगरपालिकेच्या निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. शेकाप, भाजप-शिंदे गट आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे तिन्ही पक्ष स्वतंत्र तयारी करताना दिसत आहेत. मात्र, आमदार महेंद्र दळवींच्या पुढील निर्णयावरच संपूर्ण निवडणुकीचे समीकरण अवलंबून राहणार आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेतात याबाबत अलिबागकरांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
शेकापची सत्तासंरक्षण मोहीम
शेकापनेही आपली पारंपरिक सत्ता कायम ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. माजी नगराध्यक्ष, माजी आमदार आणि स्थानिक पातळीवरील वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. अलिबागमध्ये पाणीपुरवठा, रस्त्यांची कामे, घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या स्थानिक मुद्द्यांवर मतदारांमध्ये नाराजी असली तरी, शेकाप अजूनही संघटित आणि कार्यक्षम असल्याचे मानले जाते.
शेकापविरोधी भूमिका कायम
महेंद्र दळवी यांनी गेल्या काही वर्षांपासून अलिबाग आणि परिसरातील राजकारणात शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. शेकापने दीर्घकाळ अलिबाग नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सत्ता गाजवली असली, तरी दळवी यांनी सातत्याने त्यांच्या विरोधात लढा दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांचे जाळे अलिबाग, नांदगाव, थेरोंडा, चोंढी, वरसोलीसह अनेक भागात मजबूत झाले आहे.
शिंदे गटाची स्थानिक समीकरणे
राज्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीत सत्तेत आहेत. मात्र, अलिबागसारख्या परंपरागत शेकाप गडात स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांची अंतर्गत समीकरणे गुंतागुंतीची आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्वावरून असंतोष असल्याचे बोलले जाते. त्यामुळे महेंद्र दळवी स्वतःचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरवतात का, की भाजपला पुढे करून रणनीतीने माघार घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे.