रायगड: पुढारी वृत्तसेवा : अलिबागची सुकन्या ऱ्हितिका प्रशांत जन्नावार हिने कौटुंबिक कायदा या विषयात विद्यापीठात सर्वाधिक गुण मिळवून एलएलएम पदवी संपादन केली. त्याबद्दल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तिचा बॅरिस्टर नानी पालखीवाला सुवर्ण पदक देऊन गौरव करण्यात आला. राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारंभ झाला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (Hritika Jannawar)
ऱ्हितिकाने अलिबाग येथील को.ए.सो. इंग्लिश मिडीयम आणि आरसीएफ शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ऱ्हितिकाने पुण्यातील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात कायद्याच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. एलएलबी पदवी उच्च श्रेणीत संपादन केल्यानंतर तिने एलएलएम करिता कौटुंबिक कायदा या विषयाची निवड केली. त्यात अनन्यसाधारण यश संपादन करुन ती विद्यापीठात सर्वप्रथम आली आणि बॅरिस्टर नानी पालखीवाला सुवर्ण पदकची मानकरी ठरली. (Hritika Jannawar)
बॅरिस्टर नानाभॉय ऊर्फ नानी अर्देशीर पालखीवाला हे भारतातील कायदेपंडित, घटनातज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. नानी पालखीवाला यांनी इ.स. १९७७ ते इ.स. १९७९ या कालावधीत भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणूनही काम पाहिले. भारत सरकारने त्यांना १९९८ साली पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या नावाने असलेल्या सुवर्ण पदकाला कायदा शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचे स्थान आहे. (Hritika Jannawar)
ऱ्हितिका हिचे आई -वडील दोघेही डॉक्टर आहेत. तिचे पिता डॉ. प्रशांत जन्नावार यांनी तिला कायद्याच्या पदवी अभ्यासासाठी परवानगी दिली.